'एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशानभूमी', हीच संघाची शिकवण; शताब्दी समारोहात PM मोदींचे प्रतिपादन
PM Modi on RSS Centenary : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापना दिनाच्या शताब्दी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या गौरवशाली वाटचालीस सलाम केला. नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी विशेष टपाल तिकीट आणि स्मारक नाणे जारी केले. यावेळी बोलताना त्यांनी संघाच्या सामाजिक कार्याची आणि अनेक संकटांतून खंबीरपणे उभे राहण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली.

चिरडण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण संघ खंबीर उभा राहिला
पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले की, "स्वातंत्र्यानंतर संघाला चिरडण्याचे अनेक प्रयत्न झाले," परंतु संघ या सर्व आघातांना तोंड देत वटवृक्षासारखा खंबीरपणे उभा राहिला. या प्रयत्नांवर मात करून संघाने आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ते म्हणाले की, १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होणे हा योगायोग नव्हता, तर "हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचे हे पुनरुज्जीवन होते." राष्ट्रीय चेतना वेळोवेळी नवीन अवतारांमध्ये युगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रकट होते, आणि "या युगात, संघ हा त्या शाश्वत राष्ट्रीय चेतनेचा सद्गुणी अवतार आहे," असे त्यांनी नमूद केले.
सामाजिक समरसतेसाठी संघाचे कार्य!
संघाच्या सामाजिक योगदानाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी स्वयंसेवकांनी केलेल्या निःस्वार्थ कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, "प्रत्येक स्वयंसेवक अस्पृश्यतेविरुद्ध लढला. आरएसएसच्या विचारसरणीत, कोणताही हिंदू लहान किंवा मोठा नसतो."
संघाने नेहमीच सामाजिक समरसतेसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. मोदींनी संघाच्या या भूमिकेचा उल्लेख केला. आरएसएसने 'एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशानभूमीची' संकल्पना मांडली. याचा अर्थ समाजात कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांसाठी समान व्यवस्था असावी, या तत्त्वावर संघाने काम केले आहे. ते म्हणाले की, "प्रत्येक स्वयंसेवक भेदभावाविरुद्ध लढत आहे."
संकटातील स्वयंसेवकांचे योगदान!
देशावर आलेल्या प्रत्येक आपत्तीनंतर स्वयंसेवक पुढे आले आणि त्यांनी मदतीचा हात दिला, याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. विशेषतः कोविड-१९ साथीच्या काळात स्वयंसेवकांनी केलेल्या मदतीचा त्यांनी उल्लेख केला.
विशेष टपाल तिकीट आणि स्मारक नाणे जारी
संघाच्या शताब्दी वर्षाचा गौरव म्हणून पंतप्रधान मोदींनी या समारंभात विशेष टपाल तिकीट आणि स्मारक नाणे जारी केले.
नाणे : १०० रुपयांच्या या नाण्यावर एका बाजूला राष्ट्रीय चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला सिंहासह वरद मुद्रेत भारतमातेची भव्य प्रतिमा आहे. हे नाणे संघाच्या १०० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे स्मरण करते.
शताब्दीचे साक्षीदार होणे हे पिढीचे सौभाग्य
पंतप्रधान मोदी म्हणाले, "संघाच्या शताब्दी वर्षासारख्या महान प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत, हे आपल्या पिढीतील स्वयंसेवकांचे सौभाग्य आहे." त्यांनी राष्ट्रीय सेवेसाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांना शुभेच्छा आणि अभिनंदन केले.
आपल्या भाषणाची सुरुवात करताना, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना महानवमी आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. विजयादशमी हा अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय आहे, आणि ही भारतीय संस्कृतीच्या श्रद्धेची कालातीत घोषणा आहे, असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.












Click it and Unblock the Notifications