भारतात सर्वाधिक नफा ब्राह्मण कमावत आहेत; ट्रम्प यांच्या सर्वात जवळचा माणूस काय बोलून गेला?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक सनसनाटी दावे केले आहेत. रशियन तेल खरेदी करून भारत अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धाला आर्थिक मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला, तसेच भारतातील ब्राह्मण समाज भारतीयांच्या श्रमावर नफा कमावत असल्याचा दावा करून त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे.

'ब्राह्मण नफा कमावत आहेत, हे थांबायला हवं'
नवारो म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान नेते आहेत. पण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा नेता असूनही ते पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यासोबत का हातमिळवणी करत आहेत, हे मला समजत नाही. मी भारतीय जनतेला फक्त एकच गोष्ट सांगेन, 'कृपया इथे काय सुरू आहे ते समजून घ्या. ब्राह्मण भारतीयांच्या नुकसानीवर नफा कमावत आहेत.' हे थांबायला हवं. आम्ही यावर बारीक लक्ष ठेवणार आहोत."
भारतावर ५०% टॅरिफ लावण्याच्या निर्णयाचे समर्थन
भारतावर ५०% आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे समर्थन करताना नवारो यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, "पुतिनने युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी भारत रशियन तेल खरेदीच करत नव्हता. पण आता परिस्थिती काय आहे? रशियन रिफायनरीज सवलत देतात, भारत ते तेल शुद्ध करतो आणि युरोप, आफ्रिका, आशिया येथे जास्त दराने विकतो. यातून रशियाच्या युद्धयंत्रणेला पैसा मिळतो."
अमेरिकन करदात्यांचा पैसा अप्रत्यक्षपणे युक्रेनच्या संरक्षणासाठी खर्च होत आहे, असेही नवारो म्हणाले. भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफवर बोलताना ते म्हणाले, "भारत हा टॅरिफचा 'राजा' आहे. जगात सर्वात जास्त शुल्क भारत लावतो. ते आम्हाला विक्री करू देत नाहीत. याचा फटका अमेरिकन कामगार, करदाते आणि रशियन ड्रोन हल्ल्यात मरणाऱ्या युक्रेनियन लोकांना बसत आहे."
'हे मोदींचे युद्ध आहे'
नवारो यांनी रशिया-युक्रेन संघर्षाला "मोदींचे युद्ध" असे संबोधले आहे. भारत नफ्यासाठी हे युद्ध चालू ठेवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. "युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यापूर्वी, भारताच्या एकूण आयातीमध्ये रशियन तेलाचा वाटा १% पेक्षा कमी होता. आज तो ३०% पेक्षा जास्त आहे, म्हणजे दररोज १५ लाख बॅरल. ही वाढ भारतीय मागणीमुळे नाही, तर नफेखोरांमुळे आहे. यात रक्त आणि विध्वंसाचे मूल्य दडले आहे," असेही त्यांनी म्हटले.
या सर्व आरोपांवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, नवारो यांच्या विधानांवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारताची परराष्ट्रनीती कोणत्याही एका गटात सामील न होता, राष्ट्रीय हित जपण्याची राहिली आहे. रशियाकडून तेल खरेदी करताना भारत हेच धोरण अवलंबत असल्याचा दावा भारत सरकार करत आहे. नवारो यांचे हे वक्तव्य ट्रम्प यांच्या आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा भाग आहे का, याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications