पहलगाम हल्ला : दहशतवाद्यांचे घरे उद्धवस्त, 60 ठिकाणी छापे, NIAकडे तपास!, वाचा- आर्मीची संपूर्ण मोहीम
Pahalgam terror attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांना नष्ट करण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलली आहेत.
केंद्राने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले. त्यातच आता या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. याशिवाय, दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर शाहिद अहमद कुट्टेसह सहा दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त करण्याचे काम सुरू झाले आहे.

शेकडो संशयितांना घेतले ताब्यात
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, अधिकाऱ्यांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली. ज्यामध्ये दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली, लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आणि शेकडो दहशतवाद्यांचे सहकारी व ज्यांच्यावर संशय आहे, अशा लोकांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या 14 स्थानिक दहशतवाद्यांची लिस्ट आर्मीने जाहीर केली आहे, यांच्याबाबत माहिती देण्यास बक्षीस देखील सरकारने जाहीर केले.
शनिवारी रात्री दहशतवाद्यांची घरे केली उद्धवस्त
जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील वंदिना झैनापोरा भागात काल रात्री उशिरा सुरक्षा दलांनी दहशतवादी अदनान शफीचे घर उद्ध्वस्त केले. 2024 मध्ये अदनान शफीने लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेत सामील होऊन दहशतवादाचा मार्ग स्वीकारला.
अदनान सुमारे एक वर्षापूर्वी दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि तेव्हापासून तो खोऱ्यात सक्रिय होता. याच्या काही काळापूर्वीच कुपवाडा येथील सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद याचे घर तीन सेकंदात उडवले होते.
फारुख सध्या पाकिस्तानात लपून बसला आहे आणि तिथून दहशतवादी कारवाया करत आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत 7 दहशतवाद्यांची आर्मीने घरे उद्ध्वस्त केली आहेत.
या दहशतवाद्यांचे घरे केली उद्धवस्त
अदनान शफी आणि फारूक व्यतिरिक्त, ज्या दहशतवाद्यांची घरे सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहेत. त्यात अनंतनाग जिल्ह्यातील ठोकरपोरा येथील आदिल अहमद ठोकर, पुलवामा येथील मुरान येथील अहसान उल हक शेख, त्राल येथील आसिफ अहमद शेख, शोपियानमधील छोटीपोरा येथील शाहिद अहमद कुट्टे आणि कुलगाममधील मतलहमा येथील जाहिद अहमद घनी या दहशतवाद्यांच्या घरांचा समावेश आहे.
60 हून अधिक ठिकाणी छापे
काही माध्यमांना आर्मी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 48 तासांत सुमारे 6 दहशतवाद्यांचे किंवा त्यांच्या साथीदारांचे घर पाडण्यात आले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या इतरांवरही अशीच कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. श्रीनगरमध्ये दहशतवाद समर्थित नेटवर्कचा बिमोड करण्यासाठी शनिवारी 60 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाकडून तसेच लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
पुरावा मिळविण्याचा प्रयत्न
प्रवक्त्याने सांगितले की, दहशतवादी नेटवर्क उध्वस्त करण्याच्या अथक प्रयत्नांमध्ये, श्रीनगर पोलिसांनी UAPA अंतर्गत नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या OGW आणि दहशतवादी सहकाऱ्यांच्या घरांवर शहरभरात छापे घातले.
त्यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर पोलिस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कार्यकारी दंडाधिकारी आणि स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत योग्य कायदेशीर प्रक्रियेनुसार शोध घेण्यात आला.
शस्त्रसंधी उल्लंघनाला योग्य उत्तर
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार केला आणि भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे त्यांनी सांगितले.
25-26 एप्रिलच्या रात्री काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्यांवरून विनाकारण गोळीबार करण्यात आला, असे एका सूत्राने सांगितले. त्यांनी सांगितले की, लष्कराच्या जवानांनी युद्धबंदी उल्लंघनाला योग्य उत्तर दिले.
पाकिस्तानच्या व्यापारावर परिणाम
पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय झाल्यानंतर, भारतासोबतचा व्यापार थांबल्यामुळे पाकिस्तानमध्ये औषधांच्या गरजांबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. यासाठी, ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ पाकिस्तान (DRAP) ने आकस्मिक योजना तयार करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या, पाकिस्तान औषधांसाठीच्या 30 ते 40 टक्के कच्च्या मालासाठी भारतावर अवलंबून आहे. त्याच्या कमतरतेमुळे, औषधांची गंभीर कमतरता निर्माण होऊ शकते.
कुपवाडा दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त, शस्त्रास्त्रे जप्त
कुपवाडा येथे दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त करून सुरक्षा दलांनी एक मोठा कट उधळून लावला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
मुश्ताकाबाद माछिल येथील सेदोरी नाला वनक्षेत्रातील लपलेल्या ठिकाणाहून पाच AK-47, 8 मॅगझिन, प्रत्येकी एक पिस्तूल आणि मॅगझिन, 660 AK-47 गोळ्या आणि एम4 दारूगोळ्याच्या 50 गोळ्या जप्त करण्यात आल्या.












Click it and Unblock the Notifications