महाग कांद्याने उडवली सरकारची झोप! मुंबई, दिल्लीत स्वस्त दरात विक्री सुरु, तुम्ही घ्या 'असा' लाभ
Onion News : टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याचे गगनाला भिडलेले भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारने सवलतीच्या दरात विक्री सुरू केली आहे. रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याचे दर किलोला 60 रुपयांच्या वर गेल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, तर सरकारची झोप उडाली आहे.
सणांचा काळ व लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारने मुंबई व दिल्लीत स्वस्त दराने विक्री सुरु केली आहे. याअंतर्गत लोकांना अवघ्या 35 रुपये किलो दराने कांदा खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
'या' ठिकाणी सध्या सवलतीच्या दरात विक्री सुरू
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वाढत्या किचन बजेटमधून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी ही मोहीम सुरू केली. मोहिमेचा शुभारंभ करताना अन्न वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री म्हणाले की, पहिल्या टप्प्यात दिल्ली-एनसीआर आणि मुंबईतील लोकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून दिला जात आहे.

ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी सांगितले की, दिल्ली-एनसीआरमध्ये कृषी भवन, नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया कॉम्प्लेक्स, राजीव चौक मेट्रो स्टेशन, पटेल चौक मेट्रो स्टेशन आणि नोएडाच्या काही भागांसह एकूण 38 ठिकाणी विक्री केली जाईल. मुंबईतील परळ आणि लोअर मालाडसारख्या ठिकाणी लोकांना स्वस्तात कांदा खरेदी करता येणार आहे. हा कांदा सवलतीच्या दराने 'ई-कॉमर्स' व केंद्रीय भंडार व मदर डेअरीच्या 'सफल'वरून विकला जाणार आहे.
पुढील आठवड्यापासून या शहरांमध्येही याचा लाभ मिळणार
दुसऱ्या टप्प्यात राज्यांच्या राजधान्यांमध्ये स्वस्त कांदा विक्री सुरू करण्यात येणार आहे. दुसरा टप्पा पुढील आठवड्यापासून सुरू होईल, ज्यामध्ये कोलकाता, गुवाहाटी, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, अहमदाबाद, रायपूर या शहरांचा समावेश केला जाईल.
तिसऱ्या टप्प्यात देशभरात मोहीम सुरू होणार
प्रमुख शहरांव्यतिरिक्त इतर शहरांतील लोकांनाही लवकरच कांदा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री म्हणाले की, अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरात कांद्याची स्वस्त दरात विक्री केली जाईल. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून देशभरात सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करून देणे सुरू होईल.
अशा प्रकारे स्वस्तात विकला जातोय कांदा
सरकारकडून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणारा कांदा नाफेड आणि एनसीसीएफसारख्या सहकारी संस्थांमार्फत विकला जात आहे. सहकारी संस्था समर्पित व्हॅनद्वारे स्वस्त दरात कांद्याची विक्री करत आहेत. अनुदानित कांदा इतर प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे.
कोण घेऊ शकते लाभ?
शासनाच्या या अभियानाचा सर्वांना लाभ घेता येईल. सरकारकडून देण्यात येणारा स्वस्त कांदा खरेदी करण्यासाठी कोणतेही ओळखपत्र दाखवण्याची गरज भासणार नाही, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले. सवलतीच्या दरात खरेदी केलेल्या कांद्याच्या प्रमाणावर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. याचा अर्थ सर्वसामान्यांना त्यांच्या गरजेनुसार कांदा स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे.












Click it and Unblock the Notifications