Nitish kumar resigns : मोठी बातमी! नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; काय आहे कारण? वाचा
Nitish kumar resigns rajya sabha nomination bihar politics : बिहारच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सक्रिय राज्य राजकारणातून बाहेर पडत दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द नितीश कुमार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण राज्यसभेवर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे बिहारमध्ये खळबळ माजली असून, नितीश कुमार थोड्याच वेळात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये या निर्णयामागील भावना व्यक्त केल्या आहेत.
१. संसदीय कारकीर्दीची अंतिम इच्छा
नितीश कुमार यांनी म्हटले आहे की, "माझ्या संसदीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच माझी एक इच्छा होती की, मी बिहार विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसह (विधानसभा आणि विधानपरिषद) संसदेच्या दोन्ही सभागृहांचा (लोकसभा आणि राज्यसभा) सदस्य बनावे."
२. सर्व सभागृहांचा अनुभव
नितीशकुमार यापूर्वी लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. आता राज्यसभेवर जाऊन त्यांना आपला संसदीय प्रवास पूर्ण करायचा आहे.
३. नव्या नेतृत्वाला संधी
बिहारमध्ये नव्या सरकारला आणि नेतृत्वाला मार्गदर्शक म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा आहे.
४. राजकीय पुनर्रचना
सूत्रांनुसार, केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आणि बिहारमध्ये सत्तासंघर्षातून सन्मानजनक मार्ग काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
५. विकसित बिहारचा संकल्प
सक्रिय पदावरून बाजूला होऊनही बिहारच्या विकासासाठी मार्गदर्शन करत राहण्याचा त्यांचा मानस आहे.
बातमीचे महत्त्वाचे अपडेट्स
निशांत कुमार यांच्याकडे सूत्रे? नितीश कुमार दिल्लीला गेल्यास त्यांचे सुपुत्र निशांत कुमार यांना उपमुख्यमंत्री बनवल्या जाण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कार्यकर्त्यांचा विरोध
नितीश कुमारांच्या घराबाहेर जेडीयू (JD-U) कार्यकर्त्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. "आम्हाला हा निर्णय मान्य नाही," अशा घोषणा देत कार्यकर्ते आणि नेते राजीव रंजन यांना रडू कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अमित शहा यांची उपस्थिती
नितीश कुमार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. "जे नवीन सरकार स्थापन होईल, त्याला माझे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन असेल," असे आश्वासन नितीश कुमार यांनी दिले आहे. नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात एका मोठ्या पर्वाचा समारोप होत असून, आता बिहारची धुरा कोणाच्या हाती जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नितीशकुमारांची एक्सवरील पोस्ट काय?
नितीश कुमार यांनी एक्सवर पोस्ट केली व त्यात नमूद केले की, "गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तुम्ही तुमचा विश्वास आणि पाठिंबा सातत्याने जपला आहे आणि याच ताकदीमुळे आम्ही बिहार आणि तुमच्या सर्वांची पूर्ण निष्ठेने सेवा केली आहे. तुमच्या विश्वास आणि पाठिंब्यामुळेच आज बिहार विकास आणि आदराचे एक नवे आयाम स्वीकारत आहे. यासाठी मी यापूर्वी अनेक वेळा तुमचे आभार मानले आहेत.
"माझ्या संसदीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच, मी बिहार विधिमंडळ आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात, मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य बनण्याचा प्रयत्न करीत आहे." असे त्यांनी नमूद केले.
"मी तुम्हाला प्रामाणिकपणे खात्री देतो की तुमच्याशी असलेले हे नाते भविष्यातही कायम राहील आणि विकसित बिहार बांधण्यासाठी एकत्र काम करण्याची माझी वचनबद्धता अटळ राहील. स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला माझे पूर्ण समर्थन आणि मार्गदर्शन असेल." असेही नितीश कुमार यांनी पोस्टमध्ये नमूद केले.












Click it and Unblock the Notifications