Nikki Murder: वर्षभरापूर्वीच होता निक्कीच्या हत्येचा प्लॅन; हुंडा, अवैध संबंध आणि क्रूरतेची कहाणी!
Nikki Bhati Murder Case Update : ग्रेटर नोएडा येथील निक्की भाटी (वय २८) हिच्या निर्घृण हत्येमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पती आणि सासरच्या लोकांनी तिला जिवंत जाळल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील धक्कादायक माहिती आता समोर येत असून, हत्येची ही भयानक पटकथा तब्बल एक वर्षापूर्वीच लिहिली गेली होती, जेव्हा निक्कीने आपल्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले होते.
२०२४ : हत्येचा पहिला प्रयत्न अन् गुन्हा
२०२४ मध्ये, निक्कीला पती विपिन भाटीचे दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध असल्याचे समजले. जेव्हा निक्कीने त्याला त्या महिलेसोबत पाहिले, तेव्हा त्याने निक्कीला मारहाण केली. या घटनेनंतर निक्कीने जार्चा पोलीस ठाण्यात विपिनविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.
निक्कीच्या कुटुंबीयांच्या मते, याच घटनेनंतर विपिन आणि त्याच्या कुटुंबाचा निक्कीवरील छळ अधिक वाढला. निक्कीचे वडील भिकारी सिंह पायला यांनी सांगितले, "विपिनचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध होते. तो माझ्या मुलीला मार्गातून दूर करू इच्छित होता. त्याने माझ्या मुलीला जाळून मारले."
या संदर्भात, २०२४ मधील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये विपिन एका महिलेसोबत कारमध्ये दिसत आहे. या घटनेने निक्की आणि तिच्या सासरच्या मंडळींमधील तणाव शिगेला पोहोचला होता.

२१ ऑगस्टची भयानक रात्र: क्रूरतेचा कळस
२१ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० वाजता निक्की आणि विपिन यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. निक्कीला तिचे ब्युटी पार्लर पुन्हा सुरू करायचे होते, पण विपिनने त्याला विरोध केला.
त्याने "आपल्या कुटुंबातील महिलांना पार्लर चालवण्याची किंवा इंस्टाग्रामवर रील्स बनवण्याची परवानगी नाही," असे म्हणत तिच्यावर हल्ला केला. निक्कीची बहीण कांचनच्या म्हणण्यानुसार, याचवेळी सासू दया भाटीने विपिनला थिनरची बाटली दिली. विपिनने ते निक्कीवर ओतले आणि तिला आग लावली.
या भयानक घटनेचा व्हिडिओ कांचनने रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये निक्की किंकाळ्या मारत जिन्यावरून खाली पडताना दिसत आहे.
भाजलेल्या अवस्थेत तिला प्रथम फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आणि नंतर दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण तिचा जीव वाचू शकला नाही. या घटनेचा सर्वात वेदनादायक भाग म्हणजे, निक्कीचा ६ वर्षांचा मुलगा हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहत होता. "त्यांनी आईवर काहीतरी ओतले, तिला मारले आणि नंतर लायटरने जाळले," असे त्याने पोलिसांना सांगितले.
व्हिडिओ आणि साक्षीमुळे उघडकीस आले सत्य
निक्कीची मोठी बहीण कांचन, जिचे लग्न विपिनचा भाऊ रोहितसोबत झाले आहे, तिनेच हे तीन व्हिडिओ रेकॉर्ड केले. या व्हिडिओमध्ये विपिन निक्कीला मारहाण करताना, तिच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतताना आणि नंतर ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना दिसत आहे. कांचनने सांगितले की, "मी हे व्हिडिओ रेकॉर्ड केले कारण माझ्या बहिणीच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे जगाला कळावे. जर मी हे केले नसते तर सत्य कधीच समोर आले नसते."
पोलिसांची कारवाई अन् सर्व आरोपींना अटक
पोलिसांनी या प्रकरणात वेगाने कारवाई करत विपिन भाटी, त्याची आई दया भाटी, वडील सत्यवीर भाटी आणि भाऊ रोहित भाटी या चारही आरोपींना अटक केली आहे. २४ ऑगस्ट रोजी विपिनला अटक करताना त्याने पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांनी त्याच्या पायात गोळी झाडली.
त्यानंतर त्याने निर्लज्जपणे "मला पश्चात्ताप नाही. मी तिला मारले नाही, ती स्वतःहून मेली," असे म्हटले. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम १०३ (खून), ११५(२) (जाणूनबुजून दुखापत) आणि ६१(२) (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुंडा आणि अवैध संबंध: एक दुष्टचक्र
२०१६ मध्ये निक्की आणि कांचन यांचे लग्न विपिन आणि रोहित भाटी यांच्याशी एकाच वेळी झाले होते. निक्कीच्या कुटुंबाने स्कॉर्पिओ, बाईक, सोने आणि रोख रक्कम हुंडा म्हणून दिली होती, तरीही सासरच्या मंडळींची ३६ लाख रुपये आणि मर्सिडीजची मागणी होती. निक्की आणि कांचन पार्लर चालवून पैसे कमवत होत्या, परंतु त्याचे उत्पन्नही दोन्ही भाऊ हिरावून घेत असत. निक्कीच्या सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे आणि पार्लर चालवण्याच्या तिच्या इच्छेमुळे सासरच्या लोकांचा राग वाढला. या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा हुंडा, अवैध संबंध आणि महिलांवरील हिंसाचाराचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. निक्कीच्या वडिलांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे, तर आईने आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी विपिन आणि त्याच्या आईला जबाबदार धरले आहे.












Click it and Unblock the Notifications