नरेंद्र मोदी निवृत्ती घेणार? मोहन भागवत यांनी स्पष्टचं सांगितलं....
मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 व्या वर्षी निवृत्त होणार नाहीत. त्यांनी असेही स्पष्ट केले की ते स्वतः कधीही 75 व्या वर्षी निवृत्त होतील असे म्हणाले नाहीत. जोपर्यंत संघाची गरज असेल, तोपर्यंत आपण काम करत राहू, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित तीन दिवसीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोहन भागवत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानंतर ते राजकारणातून निवृत्त होतील अशा सर्व चर्चा फेटाळून लावल्या. ते म्हणाले, "मी कधीही 75 व्या वर्षी निवृत्त व्हावे असे म्हटले नाही. निवृत्ती ही वैयक्तिक बाब नसून ती संघाच्या कामाशी जोडलेली आहे. संघ आम्हाला जे सांगेल तेच आम्ही करू."
भाजपला सल्ला देऊ शकतो, पण निर्णय पक्षाचाच
यावेळी त्यांनी भाजप आणि संघाच्या संबंधांवरही भाष्य केले. संघ भाजपसाठी सर्व निर्णय घेतो या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. "आम्ही भाजपला केवळ सल्ला देऊ शकतो, मात्र अंतिम निर्णय पक्षाचाच असतो. जर आम्ही निर्णय घेतले असते तर इतका वेळ लागला नसता", असे सूचक विधानही त्यांनी केले. भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये संघाची भूमिका आहे का, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.
घुसखोरी थांबवणे आवश्यक
देशातील घुसखोरीच्या मुद्द्यावरही त्यांनी कठोर भूमिका घेतली. "घुसखोरी पूर्णपणे थांबवली पाहिजे. सरकार या दिशेने प्रयत्न करत आहे, पण समाजानेही हे ठरवले पाहिजे की देशातील रोजगार आपल्याच नागरिकांना मिळावा. आपल्या देशातील मुस्लीम नागरिकांनाही रोजगाराची गरज आहे, पण बाहेरून आलेल्यांना रोजगार का द्यायचा," असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्याबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली आहे.












Click it and Unblock the Notifications