सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी पैलवान; कसा आला, कसा गेला? पोलिसांसमोर सगळं सांगितलं
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद शरीफुल शहजाद उर्फ विजय दास याला ठाण्यातून ताब्यात घेतले. सध्या त्याची चौकशी सुरु आहे. सैफवर हल्ला केल्याची कबूली देत त्याने या चौकशीत अनेक धक्कादायक दावे केले. शिवाय शरीराने हडकुळा असलेला हा चोरटा बांगलादेशातील नामवंत पैलवान असल्याचंही त्यानं सांगितलं. तो राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असल्याचं त्याने चौकशीत सांगितलं.

काय म्हणाला आरोपी?
सैफ अली खानवर आपणच हल्ला केला, हे आरोपी मोहम्मद शहजाद याने पोलिसांसमोर कबुल केलं. तो बांगलादेशी घुसखोर असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. बांगलादेशातून तो काही महिन्यांपूर्वी भारतात आला. त्यानंतर तो वांद्यातील एका पबमध्ये कामाला लागला. त्यापूर्वी तो वरळीत कोळीवाड्यातील एका पबमध्ये कामाला होता. मात्र तेथे एका ग्राहकाची हिऱ्याची अंगठी चोरल्यानंतर त्याला कामावरुन काढून टाकले होते, असेही त्याने पोलिस तपासात कबूल केले. वांद्यात ज्या हाँटेलमध्ये तो कामाला होता, तेथून सुटल्यावर तो या परिसरात पायीच फिरायचा. पायी फिरतानाच त्याने सैफच्या घराची टेहाळणी केली, असेही त्याने सांगितले.
सैफचे घर कसे शोधले?
आरोपी मोहम्मद शहजाद हा वांद्रे येथील हाँटेलमधील कामावरुन सुटल्यावर त्या परिसरात पायी फिरायचा. पायी फिरताना तो परिसराची पाहणी करत चालायचा. त्याने सैफच्या बंगला हेरला. सैफच्या घराच्या मागच्या बाजूस कोणताही सुरक्षारक्षक किंवा सीसीटीव्ही नसल्याचं त्याने पाहिलं. त्यानंतर त्याच्या डोक्यात हा प्लॅन आला. सैफवरील हल्ल्याच्या दिवशी तो पार्किंग एरियातून फायर एक्स्झिटपर्यंत पोहोचला. तेथून जिने चढून तो अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचला. तेथे गेल्यावर डक्ट एरियामधून तो थेट सैफच्या मुलाच्या बाथरुममध्ये शिरला, असं त्यानं पोलिसांना सांगितलं.
सैफवर कसा हल्ला केला?
आपण फक्त चोरी करायला आलो होतो, असं त्यानं पोलिसांना सांगितलं. मात्र आरडाओरड झाल्याने सैफ अली खान आपल्यावर धावला. मात्र मी पैलवान आहे. बांगलादेशात कमी वजनगटात आपण अनेक कुस्त्याही खेळल्यात. आपण थेट राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होतो, असं त्यानं पोलिसांना सांगितलं. अंगात ताकद असल्यानेच आपण सैफला खाली पाडून त्याच्यावर हल्ला करुन पळून जावू शकलो, असं त्यानं पोलिसांना सांगितलं. आता हा आरोपी खरं बोलतोय की खोटं, हे सिद्ध करण्यासाठी पोलीस त्याला क्राइम सीनवर घेऊन जाऊन सीन रिक्रिएट करणार असल्याचं सांगितलं जातंय.












Click it and Unblock the Notifications