दिवाळी गोडच! 'इतक्या' टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय; केंद्राच्या कॅबिनेटची मंजुरी
नवी दिल्ली : केंद्र सरकारची आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत डीए व डीआर तीन टक्क्यांनी वाढविण्यास मंजूरी देण्यात आली. हा फरक 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनरधारकांची दिवाळी गोड होणार आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणार तीन महिन्यांचा फरक
केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. निवृत्तीवेतनधारकांनाही महागाई दिलासा भत्ता मिळतो. या दोन्हीत वर्षातून दोनदा म्हणजेच जानेवारी आणि जुलैमध्ये वाढ करण्यात येते. केंद्राच्या सेवेतील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतन धारकांना 50 टक्के महागाई भत्ता मिळतोय. केंद्र सरकारनं जुलैमध्ये निर्णय घेणं अपेक्षित असताना निर्णय न झाल्यानं विविध कर्मचारी संघटनांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहिलं होतं. आता केंद्राच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा फरक मिळणार आहे.

ऑक्टोबरमध्ये पगार वाढवून मिळणार
केंद्र सरकारकडून वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. सध्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळत होता. मार्च महिन्यात केंद्रानं 4 टक्के वाढ केली होती. केंद्र सरकारनं आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता 3 टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं कोट्यवधी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार वाढवून मिळेल, त्याशिवाय निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ होईल. याशिवाय जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा फरक देखील मिळणार आहे.
यापूर्वी झाली होती चार टक्के वाढ
केंद्र सरकारकडून केंद्राच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये दोनदा वाढ करण्यात येते. याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं होतं. केंद्र सरकारनं महागाई भत्ता वाढवल्यानंतर राज्य सरकारांकडून देखील त्यांच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली जाते. केंद्राच्या निर्णयानंतर इतर कोणती राज्य असा निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा भत्ता मार्च महिन्यात चार टक्क्यांनी वाढला होता. आता तो तीन टक्क्यांनी वाढला आहे.












Click it and Unblock the Notifications