Mathura Shri Krishna Janmabhoomi : ईदगाहला 'वादग्रस्त ढाचा' मानण्यास HCचा नकार; हिंदू पक्षाला धक्का
Mathura Shri Krishna Janmabhoomi Shahi Idgah Mosque Case Timeline : मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने 3 जूलै रोजी मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने शाही ईदगाहला 'वादग्रस्त संकुल' मानण्यास नकार दिला. न्यायमूर्ती राम मनोहर मिश्रा यांच्या एक न्यायमूर्ती खंडपीठाने हा निर्णय दिला.
न्यायालयाने म्हटले आहे की, विद्यमान तथ्ये आणि याचिकेच्या आधारे, ईदगाहला सध्या वादग्रस्त ढाचा म्हणून घोषित करता येणार नाही. हिंदू बाजूने असा दावा केला होता की, ईदगाह श्री कृष्णाच्या जन्मस्थळावर असलेले प्राचीन मंदिर पाडून बांधण्यात आली होती. परंतु, न्यायालयाच्या निर्णयाने हिंदू पक्षाला मोठा झटका बसला आहे.

हिंदू पक्षाची काय होती मागणी?
हिंदू पक्षाची बाजू मांडणारे वकील महेंद्र प्रताप सिंह यांनी 5 मार्च रोजी दाखल केलेल्या याचिकेत (अर्ज A-44) मागणी केली होती की, शाही ईदगाह मशीद अधिकृत कागदपत्रांमध्ये आणि न्यायालयीन कामकाजात 'वादग्रस्त रचना' म्हणून नोंदवली जावी.
त्यांनी असा दावा केला होता की, श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर संकुलाच्या 13.37 एकर जमिनीवर अतिक्रमण करून मशीद बांधण्यात आली आहे. याचिकेत न्यायालयाला 'शाही ईदगाह मशीद' ऐवजी 'वादग्रस्त रचना' हा शब्द वापरण्याचे निर्देश स्टेनोग्राफरला द्यावेत, अशी विनंती करण्यात आली होती.
मुस्लिम पक्षाने घेतला होता आक्षेप!
मुस्लिम पक्षाच्या वतीने या मागणीला जोरदार विरोध करण्यात आला. त्यांनी लेखी आक्षेप दाखल केला. त्यांनी म्हटले की ही मागणी चुकीची आहे आणि मशीद ऐतिहासिकदृष्ट्या मान्य आहे. त्यामुळे हिंदू पक्षाची मागणी चूकीची आहे.
न्यायालयाचा निर्णय
न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या एकल खंडपीठाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर 23 मे रोजी निर्णय राखून ठेवला होता. तर काल 3 जुलै 2025 रोजी न्यायालयाने याचिका फेटाळून लावत म्हटले की, त्यात 'ठोस कायदेशीर आधार' नाही. न्यायालयाने मुस्लिम बाजूचा आक्षेप कायम ठेवला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे.












Click it and Unblock the Notifications