राष्ट्रपती, पंतप्रधान मोदी आणि शहा महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करणार, जाणून घ्या तारखा
Mahakumbh Mela 2025: उत्तर प्रदेशामधील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ 2025 मध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. महाकुंभ मेळ्यात सुमारे 45 कोटी भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा मानला जातो. अशा परिस्थितीत सुरक्षा आणि व्यवस्थेच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जात आहे. महाकुंभात स्नान करण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून लाखो लोक येत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील लवकरच महाकुंभमेळ्यात सहभागी होणार असल्याची बातमी येत आहे.
सोमवारी रात्री उशिरा (ता.20 ) जानेवारी पर्यंत 8.81 कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात स्नान केल्याची माहिती आहे. अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी हे देखील प्रयागराजला पोहोचले आहेत. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या महाकुंभात स्नान करण्याच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

फाईल फोटो सौजन्य- पीटीआय
पंतप्रधान, राष्ट्रपती महाकुंभाला कधी जाणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारी रोजी महाकुंभ मेळ्याला भेट देणार आहेत. याशिवाय, उपराष्ट्रपती जगदीप धनखड 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाकुंभात सहभागी होतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या महाकुंभात सहभागी होण्याची तारीख 10 फेब्रुवारी असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 जानेवारी रोजी महाकुंभाला भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या कार्यक्रमात संगम येथे पवित्र स्नान, गंगा पूजन आणि अधिकाऱ्यांशी भेटी समाविष्ट आहेत. दरम्यान, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिस आणि इतर सुरक्षा एजन्सी सतर्क आहेत.
दरम्यान माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रयागराज महाकुंभात पोहोचले आहेत. महाकुंभ मेळ्याच्या नियोजन व व्यवस्थेबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे कौतूक केलं आहे. रामनाथ कोविंद म्हणाले की, "येथील व्यवस्था खरोखरच खूप चांगली आहे, सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मी अनेक शिबिरांमध्ये गेलो. मी खूप आनंदी आहे. योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारने केलेली व्यवस्था खरोखरच खूप चांगली आहे, मी प्रशासनाचे आभार मानतो," अशी प्रतिक्रिया माजी राष्ट्रपतींनी दिली आहे.












Click it and Unblock the Notifications