देशात गॅसचा 'एवढा' साठा! बुकिंगमध्ये मोठी वाढ; सरकारने 'हे' घेतले महत्त्वाचे निर्णय, उपाय जाणून घ्या
Lpg supply update : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील ऊर्जा सुरक्षेबाबत केंद्र सरकारने मोठे अपडेट दिले आहे. अफवा आणि भीतीपोटी गॅस सिलिंडरच्या बुकिंगमध्ये झालेली प्रचंड वाढ पाहता, सरकारने नागरिकांना 'पॅनिक बुकिंग' न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, 'स्ट्रॅट ऑफ होर्मुज'मध्ये अडकलेली दोन महत्त्वाची भारतीय जहाजे सुखरूप बाहेर पडली असून ती लवकरच भारतीय बंदरांत दाखल होणार आहेत.

सध्याची ताजी स्थिती: ठळक मुद्दे
दोन जहाजांची सुटका: ९२,७१२ मेट्रिक टन एलपीजी घेऊन येणारी 'शिवालिक' आणि 'नंदा देवी' ही दोन भारतीय जहाजे 'होर्मुज'ची सामुद्रधुनी ओलांडून मुंद्रा आणि कांडला बंदराकडे रवाना झाली आहेत. ती १६-१७ मार्चपर्यंत पोहोचतील.
अडकलेली जहाजे: अद्यापही २२ भारतीय जहाजे आणि ६११ नाविक त्या भागात आहेत, ज्यांच्या सुरक्षेवर सरकारचे बारीक लक्ष आहे.
बुकिंगमध्ये मोठी वाढ: गॅस टंचाईच्या अफवेमुळे दैनंदिन बुकिंग ५५.७ लाखांवरून थेट ८८.८ लाखांवर पोहोचले आहे.
सरकारचे महत्त्वाचे निर्णय आणि उपाययोजना
सरकारने देशांतर्गत गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काही कठोर आणि धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.
१. घरगुती वापराला प्राधान्य: स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा खंडित होऊ नये म्हणून रिफायनरींमधील एलपीजी उत्पादनात ३१% वाढ करण्यात आली आहे.
२. बुकिंगमधील अंतरात बदल: शहरी भागात आता २५ दिवसांनंतर, तर ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या अंतरानेच गॅस रिफिल बुक करता येईल. यामुळे साठेबाजीला चाप बसेल.
३. व्यावसायिक सिलिंडरचा वापर: व्यावसायिक (Commercial) सिलिंडरचा साठा राज्य सरकारांकडे सोपवण्यात आला असून, हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना गॅसऐवजी बायोमास किंवा पर्यायी इंधन वापरण्याची मुभा दिली आहे.
४. साठेबाजीवर कारवाई: महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत छापे टाकून काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकट्या उत्तर प्रदेशात २४ एफआयआर दाखल झाले आहेत.
५. डिजिटल बुकिंगवर भर: नागरिकांनी एजन्सीवर गर्दी न करता WhatsApp, SMS किंवा ॲपद्वारे डिजिटल बुकिंग करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
अफवांवर विश्वास ठेवू नका: पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे सरकारतर्फ ेसांगण्यात आले आहे.
पॅनिक बुकिंग टाळा: केवळ गरजेनुसारच सिलिंडर बुक करा असेही सरकारतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी इंधन: जिथे उपलब्ध आहे तिथे पीएनजी (PNG) कनेक्शनचा वापर वाढवण्याचे आवाहन केंद्र सरकारतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा : LPG Crisis : होर्मुजमध्ये 22 भारतीय जहाजे अडकली; 600 भारतीयांचे जीव धोक्यात! गॅस संकट वाढणार?












Click it and Unblock the Notifications