कोलकात्यात महिला डॉक्टरांवरील अत्याचार, खुनाने देशात संताप, निवासी डॉक्टर रस्त्यावर, उद्यापासून संप
कोलकाता : कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि खून प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने उद्या 12 ऑगस्टपासून देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने सर्व सरकारी रुग्णालयांच्या निवासी डॉक्टरांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे ओपीडी सेवा, शस्त्रक्रिया आणि प्रयोगशाळेच्या कामावर परिणाम होऊ शकतो.

आरडीएकडूनही डॉक्टरांना संपावर जाण्याची नोटीस
आरजी कार मेडिकल कॉलेजचे ज्युनियर डॉक्टर देखील पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी सतत आंदोलन करत आहेत. केवळ एका संशयिताला अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपी अजूनही मोकाट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. घटनास्थळावरील महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज अद्याप तपासण्यात आलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रुग्णालयातील सर्व काम बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
वैद्यकीय अधिक्षकांना पदावरुन हटवलं
या घटनेनंतर आरोग्य विभागाने डॉ.संजय वशिष्ठ यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षक पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी रुग्णालयाचे डीन बुलबुल मुखोपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यापासून त्यांना वशिष्ठ यांना अधिक्षक पदावरुन काढून टाकण्याची सातत्याने मागणी झाली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
संशयित आरोपीला अटक
कोलकाता पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले. पुढील चौकशीसाठी त्याला 23 ऑगस्टपर्यंत 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर BNS कलम 64 आणि 103 अंतर्गत बलात्कार आणि खुनाचा आरोप आहेत.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी विनंती केल्यास सीबीआय तपासाला मी पाठिंबा देते, असे त्यांनी सांगितले. "जर त्यांचा पश्चिम बंगाल सरकारवर विश्वास नसेल तर ते कोणत्याही तपास संस्थेशी संपर्क साधू शकतात," असेही त्या म्हणाल्या. जलदगती न्यायालयात खटला निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
लैंगिक अत्यचारानंतर खून झाल्याचे स्पष्ट
राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राज्य सरकारला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. हा मुद्दा केंद्र सरकारकडे मांडण्याची त्यांची योजना आहे. प्राथमिक उत्तरीय अहवालात महिला डॉक्टरचा खून करण्यापूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयएमएचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा
- इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने 48 तासांचा अल्टिमेटम जारी केला आहे आणि पोलिसांकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे. तसे न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
- दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करत कँडल मार्च काढला.
- "पोलिस अधिकाऱ्यांनी 48 तासांच्या आत तत्काळ कारवाई करावी. अशी आमची मागणी आहे; अन्यथा, आम्हाला देशव्यापी संप सुरु करावा लागेल" असे आयएमएने म्हटले आहे.
काय म्हणाले कोलकाताचे पोलिस आयुक्त?
कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी हे आरोप परिस्थितीजन्य पुरावे आणि रात्रीच्या ड्युटीवर उपस्थित डॉक्टरांच्या साक्षीवर आधारित असल्याचं स्पष्ट केलं आहे. हा एक गंभीर गुन्हा आहे, असेही ते म्हणाले. आरोपींना पोलिस जास्तीत जास्त शिक्षा मिळावी म्हणून प्रयत्न करतील असे ते म्हणाले. या निर्घृन खुनामुळे संपूर्ण भारतातील वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी जोर धरत आहे.












Click it and Unblock the Notifications