ज्योती मल्होत्रा प्रकरण: मुस्लिम धर्म स्विकारून पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न?
भारतातील गुप्त लष्करी माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्रा प्रकरणात दररोज नव्या चर्चा आणि अफवा समोर येत आहेत. सोशल मीडियावर तिच्या धर्मपरिवर्तनापासून ते पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न केल्यापर्यंत अनेक दावे केल्या जात आहेत. मात्र, हिसार पोलिसांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत तपासाचा अधिकृत अहवाल समोर ठेवला आहे.

पोलिसांचा स्पष्ट निर्वाळा - लग्न, धर्मपरिवर्तनाचे कोणतेही पुरावे नाहीत
हिसार पोलिसांनी सांगितले की, ज्योतीने कोणताही धर्म बदलल्याचे किंवा तिने कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीसोबत विवाह केल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप तपासात मिळालेले नाहीत. पोलिसांच्या मते, हे सर्व केवळ अफवा आणि तर्क आहेत.
ज्योती सध्या पोलीस कोठडीत आहे आणि तिची पाच दिवसांची रिमांड आता संपत आली आहे. या काळात तिचा मोबाईल, लॅपटॉप, बँक खात्यांची सखोल तपासणी करण्यात आली. तरी अद्याप कुठलाही ठोस आणि निर्णायक पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
डिजिटल उपकरणांमध्ये गुप्त माहिती नसल्याचे संकेत
पोलीस तपासानुसार, ज्योतीच्या डिजिटल उपकरणांत - मोबाईल, लॅपटॉप यामध्ये - कोणतीही लष्करी गोपनीय माहिती, रणनीतिक दस्तऐवज किंवा संवेदनशील डेटा आढळलेला नाही. फॉरेन्सिक प्रयोगशाळेची अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे, जो या प्रकरणाच्या
गंभीरतेवर अंतिम शिक्कामोर्तब करेल.
व्हॉट्सअॅप चॅटमधील संवादांबाबतही पोलीस अधिकृतरीत्या काहीही सांगू शकलेले नाहीत, मात्र याच चॅट्समध्ये पुढील तपासासाठी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येतो.
ऑनलाइन व्यवहारांची कसून तपासणी
ज्योतीच्या चार बँक खात्यांची तपासणी सध्या सुरू असून, यातून काहीही संशयास्पद व्यवहार समोर आलेले नाहीत. तरीही पोलिसांनी बँकिंग तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक तज्ञांची मदत घेतली आहे, जेणेकरून व्यवहारांचा सखोल तपास करता येईल.
पोलिसांचा संशय आहे की, डिजिटल वॉलेट्स, क्रिप्टोकरन्सी किंवा मनी ट्रान्सफर अॅप्सद्वारे पाकिस्तानकडून आर्थिक मदत मिळालेली असू शकते. तांत्रिक तपासण्या सध्या सुरु आहेत.
पाकिस्तानी गुप्तचर संपर्क होते, पण दहशतवादी संबंध नव्हते
पोलिस तपासानुसार, ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी संपर्कात होती, परंतु आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेशी तिचे थेट संबंध असल्याचे किंवा ती कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे सापडलेले नाहीत.
धर्म परिवर्तन किंवा पाकिस्तानच्या अधिकाऱ्याशी लग्न या चर्चांमध्येही काही तथ्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांचे अधिकृत विधान
हिसार पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "आतापर्यंतच्या तपासात आरोपी ज्योती मल्होत्राने भारताच्या संरक्षण यंत्रणेशी संबंधित कोणतीही संवेदनशील माहिती लीक केल्याचे स्पष्ट झालेले नाही. मात्र, तपास सुरूच आहे आणि सर्व शक्य कोन तपासले जात आहेत."
अफवांपेक्षा तथ्य महत्वाचे
ज्योती मल्होत्रा प्रकरणात सोशल मीडियावर उडणाऱ्या अफवांना बाजूला ठेवून तपास यंत्रणांनी पुराव्यांच्या आधारे आपली भूमिका मांडली आहे. हे प्रकरण केवळ एक हेरगिरी प्रकरण आहे की यामध्ये काही अजून खोल गोष्टी दडल्या आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल.












Click it and Unblock the Notifications