Jharkhand Election Dates : झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला 2 टप्प्यात मतदान; 23 नोव्हेंबरला निकाल
Jharkhand Election Dates 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंडमध्ये निवडणुकींची घोषणा केली आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा 13 नोव्हेंबरला तर दुसरा टप्पा 20 नोव्हेंबरला होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या घोषणेसह झारखंडमध्ये आचारसंहीताही आजपासून लागू झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विज्ञान भवन, दिल्ली येथे आज दुपारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. निवडणुकीशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती आयोगाचे अध्यक्ष राजीवकुमार यांनी जारी केली आहे.

झारखंड निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने याआधी दौरा करुन आढावा घेतला होता. तसेच सर्व राजकीय पक्षांशी चर्चाही केली होती. त्यानंतर आयोगानेही आपल्या वतीने सर्व तयारी पूर्ण केली आणि आज झारखंडमधील निवडणुका जाहीर केल्या. यासोबतच झारखंडमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी मतदान
झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी मतदान होणार आहे. या जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी अर्थातच विजय संपादन करण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. यावेळी इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. सर्व नेत्यांनी आपापल्या भागात प्रचाराला सुरुवात केली आहे.
मागच्यावेळी झाल्या होत्या 5 टप्प्यात निवडणुका
झारखंड विधानसभा निवडणुका 2019 मध्ये 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या पाच टप्प्यांत झाल्या होत्या आणि 23 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. त्या निवडणुकीत महाआघाडीचा विजय झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सध्या तेथील मुख्यमंत्री आहेत.
काय होते 2019 च्या निवडणुकीचे निकाल?
2019 मध्ये झारखंडमध्ये JMM-CONG-RJD युतीचे सरकार स्थापन झाले. हेमंत सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. 2019 च्या निवडणुकीच्या निकालांमध्ये JMMने 30 जागा, काँग्रेसने 16, RJD ने 1 आणि भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही त्यांची जमशेदपूर पूर्वची जागा वाचवता आली नव्हती.
नवीन मतदार यादी जाहीर
नवीन मतदार यादी प्रसिद्ध करताना मुख्य निवडणूक अधिकारी के रवि कुमार यांनी सांगितले की 1 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत 1.54% ची वाढ झाली आहे, तर 25 जुलै रोजी जाहीर केलेल्या फॉर्मेटमध्ये 0.49% ची घट झाली आहे. आयोगाच्या आकडेवारीनुसार, मतदार यादी पुनरिक्षणादरम्यान 3 लाख 89 हजार 595 मतदार मृत आढळले, 1 लाख 31 हजार 786 मृत आढळले, 1 लाख 31 हजार 786 स्थलांतरणामुळे आणि 75 हजार 154 मतदार एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार असल्याने काढून टाकण्यात आले.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 1 ऑक्टोबर रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांकडून 55 हजार 189 अर्ज प्राप्त झाले आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी राज्यात 2 कोटी 53 लाख 86 हजार 152 मतदार होते.
राज्यात 41 मतदान केंद्र वाढले
- राज्यातील मतदान केंद्रांची संख्या 29 हजार 562 झाली आहे.
- राज्यातील 41 मतदान केंद्रे पूर्वीच्या मतदान केंद्रांपेक्षा जास्त आहेत.
- नवीन मतदार यादीत 18 ते 19 वयोगटातील पुरूष मतदारांची संख्या 4 लाख, 80 हजार 760 आहे.
- नवीन महिला मतदारांची संख्या 5 लाख 93 हजार 959 आहे.
- 18 ते 19 वयोगटातील एकूण मतदारांची संख्या 10 लाख, 74 हजार, 732 इतकी आहे.
- तृतीयपंथीय मतदारांची संख्या 13 आहे.
- 22 जानेवारी 2024 नुसार, राज्यात 2 कोटी 53 लाख 86 हजार 152 मतदार












Click it and Unblock the Notifications