झारखंड : मतदानापूर्वी भाजप नेत्यावर प्राणघातक हल्ला, परिसरातील तणावपूर्ण वातावरण
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज बुधवार 13 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत 13.04% मतदान झाले. दरम्यान मतदानापूर्वी भाजप नेते रामदास साहू यांच्यावर पलामूच्या पंकी विधानसभा मतदारसंघातील तारशीमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. निवडणुकीच्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची बोललं जातयं.

पलामूचे प्रसिद्ध उद्योगपती रामदास साहू यांनी पंकी येथील भाजपचे उमेदवार आमदार कुशवाह शशी भूषण मेहता यांना उघडपणे पाठिंबा दिला आहे. मेहता यांच्या बाजूने मतांसाठी ते जोरदार प्रचार करत आहेत. साहू यांच्या म्हणण्यानुसार माजी आमदार देवेंद्र सिंग उर्फ बिट्टू सिंग यांच्या 50 हून अधिक समर्थकांनी त्यांना बेदाणी मोरजवळ जबरदस्तीने त्यांच्या कारमधून बाहेर काढत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
राजकीय तणाव वाढला
या हल्ल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ आमदार कुशवाह शशी भूषण मेहता यांनी तारशी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. समर्थकांनी पोलीस ठाण्याच्या गेटवर जमत न्यायाची मागणी करत घोषणाबाजी केली. डॉ. मेहता म्हणाले की, बिट्टू सिंग यांचे समर्थक निराशेतून हे करत आहेत. साहू यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी विविध भागात गोळीबार केला. या कृत्यांना जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदारांनी केली आहे.
देवेंद्र सिंह उर्फ बिट्टू सिंग यांनी आरोप फेटाळले
एसडीपीओ मनोज झा यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, माजी आमदार देवेंद्र सिंह उर्फ बिट्टू सिंग यांनी शशी भूषण मेहता यांचे आरोप फेटाळून लावत हा आपल्याविरोधातील कटाचा भाग असल्याचे म्हटले आहे. अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याने परिस्थिती तणावपूर्ण आहे. या तपासणीच्या निकालाचा परिणाम या निवडणूक रिंगणात सामील असलेल्या दोन्ही राजकीय पक्षांवर होऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications