झारखंड विधानसभा निवडणुकीत 14 जागांवर तिरंगी लढत! पहा कुणाच्या भात्यात कोणते आहेत शस्त्र?
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड निवडणुकीसाठी इंडिया आघाडी व एनडीए या दोन्हींमध्ये आता शेवटच्या टप्प्यात चुरस पहायला मिळत आहे. दिवाळीनंतर या दोन्हींमधली लढाई अजून रंजक वळणावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इंडिया आघाडीने झारखंडबाबत केंद्र सरकारची उदासिनता व मोदींची दुर्लक्ष हे मुद्दे प्रचारात घेतल्याचे दिसते. दुसरीकडे एनडीएचे पारडे जड दिसत असून त्यांनी राज्यातील बेरोजगारी, बांग्लादेशातील घुसखोरी, धर्मांतर हे मुद्दे प्रचारात घेतलेले दिसत आहेत.

14 जागांवर होणार समोरासमोर लढत
झारखंडमध्ये 81 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी 65 जागांवर समोरासमोर दोन पक्षात लढत होणार आहे. तर धनवर आणि इचरगड या दोन जागांवर चार प्रमुख पक्षांमध्ये सामना रंगणार आहे. तर उर्वरीत 14 जागांवर तिरंगी लढत होणार आहे. या सर्व लढती अगदी तुल्यबल होण्याची अपेक्षा दोन्ही गटांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बरही, सिमडेगा, गढवा, बेरमो, डुमरी, जमशेदपुर पश्चिम, हटिया, कोलेबिरा, गुमला, टुंडी, गोमिया, छतरपूर, विश्रामपूर, सिल्ली या चौदा जागांवर तिरंगी लढत होणार आहे.
इंडिया आघाडीचे हेमंत सोरेन कर्णधार
इंडिया आघाडीकडे मैनिया योजना हे मोठे शस्त्र समजले जात आहे. त्याशिवाय केंद्रीय एजन्सींचा गैरवापर हा मुद्दाही प्रचारात चांगलाच गाजवला जाताना दिसत आहे. शिवाय केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांकडे केलेले दुर्लक्षही इंडिया आघाडी प्रचारात घेताना दिसत आहे. सर्वजन पेन्शन, वीज बील माफी या मुद्द्यांवरही इंडिया आघाडी प्रचार करताना दिसणार आहे. कल्पना सोरेन, तेजस्वी, केशव महातो, कमलेश, राजेश ठाकूर हे इंडिया आघाडीकडून जोरदार प्रचार करताना दिसत आहेत.
मोदींचा चेहराच एनडीएची ताकद
एनडीएने प्रचारात आघाडी घेतली असून सध्यातरी त्यांची बाजू वरचढ दिसत आहे. शिवराज सिंह चौहान व हिमंत बिस्वा सिरमा यांनी प्रचाराची कमान हाती घेतली असून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, बांग्लादेशी घुसखोरी, धर्मांतर, स्थलांतर, गोगो दीदी योजना आणि रोटी-माटी-बेटी बचाओचा नारा या सगळ्यांच्या जोरावर एनडीएचा प्रचार सुरु झाला आहे. बाबूलाल मरांडी, अर्जुन मुंडा, चंपाई सोरेन, सुदेश महतो, अमर कुमार बौरी, लक्ष्मीकांत वाजपेयी या सरदारांच्या जोरावर एनडीएने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications