मोठी दुर्घटना टळली! कोलकाता-श्रीनगर जाणाऱ्या विमानात इंधन गळती, 'या' एअरपोर्टवर इर्मजन्सी लँडिंग
IndiGo Flight from Kolkata to Srinagar Makes Emergency Landing : कोलकाताहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचे बुधवारी संध्याकाळी (२२ ऑक्टोबर २०२५) तांत्रिक बिघाडामुळे वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातून इंधन गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वैमानिकाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
इंधन गळती आणि आपत्कालीन लँडिंग
इंडिगोचे विमान क्रमांक ६ई-६९६१ हे कोलकाता येथून श्रीनगरसाठी निघाले होते. हवेत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे आणि विमानातील इंधन गळत असल्याचे क्रूच्या लक्षात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, क्रूने तातडीने जवळच्या वाराणसी विमानतळ येथील एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत दुपारी ४:१० वाजता हे विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरवले.

सर्व प्रवासी सुरक्षित!
या विमानात एकूण १६६ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. आपत्कालीन लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले आणि विमानतळाच्या आगमन क्षेत्रात बसवण्यात आले.
वाराणसी पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, "विमानतळ अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि विमानतळाचे सामान्य कामकाज पुन्हा सुरू झाले आहे."
प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था!
दुसरीकडे, इंडिगो एअरलाइनने या घटनेबद्दल माहिती दिली असून, विमानात बिघाड झाल्याची पुष्टी केली आहे. एअरलाइनने सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने श्रीनगरला पाठवण्याची व्यवस्था केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या महिन्यातही बिघाड!
इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात, लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक ६ई-२१११ मध्येही तांत्रिक बिघाड झाला होता.












Click it and Unblock the Notifications