Murli Naik : पाकड्यांचा खात्मा अन् त्यांनी शेवटचा घेतला श्वास; शहीद झालेले जवान मुरली नाईक कोण?
who is Indian soldier Murali Naik : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. एअर स्ट्राईकद्वारे सीमारेषेवर घणाघात घातला जातोय. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला देखील भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे.
दुसरीकडे सीमारेषेवर देखील तणावाचे वातावरण असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. पूँछ, उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे. मात्र, उरी सेक्टरमध्ये मुंबई घाटकोपर या ठिकाणी राहणाऱ्या मजूर बापाचा लेक तथा भारतीय सैन्यातील जवान मुरली नाईक हे पाकड्यांशी लढताना शहीद झाले.
त्यांच्या वीरमरणाचे वृत्त गावी येताच, कुटुंबीयांनी टाहो फोडला, ज्या भागात त्याचे कुटुंब राहत होते, त्या ठिकाणी शोककळा पसरली आहे. दुसरीकडे मुरली नाईक हे मुळचे आंधप्रदेशातील असल्याने त्यांच्या मुळगावी देखील शोककळा पसरली आहे. तर, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

कोण आहे मुरली नाईक?
मुरली नाईक हे मूळचे आंध प्रदेशातील, पण त्यांचे वडिल कामानिमित्त मुंबईत आले. मुंबईतील घाटकोपर भागात मजुरीचे काम करुन त्यांनी लेकाला सैन्य दलात भरती होण्यापर्यंत शिक्षण दिले. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या 23 वर्षीय मुलाला वीरमरण आले. शहीद जवान मुरली श्रीराम नाईक, (वय 23 वर्षे) हे उरी, जम्मू काश्मीर येथे कर्तव्य करीत असताना आज 09 मे रोजी पहाटे 03:30 वाजता भारत पाकिस्तान युद्ध चालू असताना शहीद झाले आहेत.
2022 मध्ये सैन्यात झाले होते सहभागी?
पंतनगर पोलीस ठाणे, मुंबई हद्दीतील सध्या चित्रा डेअरी जवळ, कामराज नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई या ठिकाणी राहणारे मुरली नाईक हे 2022 मध्ये भारतीय सेना दलामध्ये नोकरीस लागले होते. त्यांची ट्रेनिंग देवळाली, नाशिक येथे झाली होती, ते पहिल्यांदा आसाम येथे पोस्टिंगला होते, त्यानंतर ते पंजाब येथे तैनातीस असताना त्यांना युद्धा दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्य देण्यात आले होते.
त्या दरम्यान युद्धजन्य परिस्थितीत पाकड्यांशी लढताना जवान मुरली नाईक शहीद झाले आहेत. त्यांचे वडील श्रीराम नाईक व त्यांची आई ज्योती नाईक हे पंतनगर पोलीस ठाण्यातील चित्रा डेअरी जवळ, कामराज नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई या ठिकाणी राहावयास आहेत. वडील श्रीराम नाईक हे मजुरी काम करतात.
उद्या मुळगावी होणार अंत्यसंस्कार!
मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील असून सध्या त्यांचे कुटुंब त्यांच्या मूळ गावी कल्की तांडा, गोरंटाला मंडळा, जिल्हा सत्यसाई नगर, राज्य आंध्र प्रदेश या ठिकाणी यात्रा असल्याने 02 मे 2025 रोजी गेलेले आहेत. त्यामुळे, शहीद जवान यांचे प्रेत अंत्य विधिकारिता त्यांच्या मूळ गावी उद्या 10 मे रोजी सायंकाळी जाणार आहे, असे पंजाब थलसेना कार्यालयातून त्यांना कळविण्यात आले आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी अर्पण केली श्रद्धांजली
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या घटनेनंतर दु:ख व्यक्त केले. ते म्हटले की, "देशाच्या रक्षणासाठी श्री सत्य साई जिल्ह्यातील पेनुकोंडा विधानसभा मतदारसंघातील गोरंटला मंडल येथील मुरली नाईक या जवानांचे प्राण गेले. देशासाठी आपले जीवन अर्पण करणारे शहीद मुरली नाईक यांना श्रद्धांजली. मी त्यांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो., त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications