लक्ष्मीपूजन कसे करावे, पूजा कशी मांडावी, जाणून घ्या सोप्या टिप्स अन् त्याचे महत्त्व..!
Lakshmi Puja : दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण. पाच दिवसांचा हा सण दिव्यांची आरास, फराळ, फटाक्यांच्या आतिषबाजीने उत्साहात साजरा केला जातो. त्यातील आजचा अर्थात 1 नोव्हेंबरचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. चला तर जाणून घेऊया, लक्ष्मीपूजन कसे करायते, पूजा नेमकी कशी मांडायची, याविषयी सविस्तर...!
दिवाळीतील पाच दिवसांपैकी एक असलेल्या लक्ष्मीपूजन दिनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मीची आराधना व पूजा केली जाते. अनेकांना लक्ष्मीची पूजा कशी मांडावी? घरी किंवा कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन कसे करावे, याविषयी माहिती नसते पण टेन्शन घेऊ नका. आज आपण या विषयी सविस्तर माहिती घेऊ. लक्ष्मीपूजन करण्यास अवघा काही वेळ बाकी आहे, अशातच तुम्हाला ही बातमी बरंच काही सांगून मदत करणार आहे.

लक्ष्मीपूजन कसे करावे?
लक्ष्मी सरस्वती पूजनाचे तीन प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. भाद्रपद शुक्ल पक्षांत, अश्विन शुक्ल पक्षांत आणि कृष्ण अमावास्येस. या तीन प्रकारांपैकी पहिले दोन्ही प्रकार प्रत्येक घरीच होत असतात. परंतु तिसऱ्या प्रकारचे जे लक्ष्मीपूजन आहे ते फक्त "व्यापारे वसते लक्ष्मीः" या अर्थाने म्हणजे व्यापारी वर्गात केले जाते. म्हणजे विविध कार्यालयात हा सण साजरा केला जातो. पूजन केले जाते.
कसे मांडावे घरी लक्ष्मीपूजन?
- सुरूवातीला चौरंग घ्यावा.
- चौरंगावर लाल कापड टाकावा.
- त्यावर तांदूळ टाकून एक कलश ठेवावा.
- त्या कलशावर एक प्लेट ठेवून त्या प्लेटवर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी व त्या मूर्तीची पूजा करावी.
- तसेच लक्ष्मीचा फोटो ठेवावा व विडा ठेवावा. त्या विड्यावर नारळ ठेवावे.
- सुरूवातीला गणपतीची पूजा करावी नंतर लक्ष्मीची पूजा करावी. शेवटी मनोभावे आरती करावी.
लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त कोणता?
या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावर लक्ष्मीचे तसेच कुबेर पूजन देखील केले जाते. यावर्षी शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. शुक्रवारी एक तारखेला सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ पर्यंत तुम्हाला कधीही लक्ष्मी पूजा करता येईल.
दिवाळीत का केलं जातं लक्ष्मीपूजन
धन संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे लक्ष्मीपूजन करायचे आहे. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते. आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते.
जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. तसेच देवीला स्वच्छता आणि शांतता प्रिय आहे, जिथे असे घर असेल तिथेच लक्ष्मी निवास करते. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे. सर्व केर कचरा घरातून काढून टाका, म्हणजे या दिवशी अलक्ष्मी घराबाहेर जाते अन् लक्ष्मी घरात येते.












Click it and Unblock the Notifications