देशात IAS-IPS ची किती पदे रिक्त आहेत? राज्यसभेत केंद्रीय मंत्र्यांच्या उत्तरात खुलासा
How many IAS IPS in India: देशभरात मोठ्या प्रमाणात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची पद रिक्त आहेत. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) संवर्गातील मंजूर पदांच्या तुलनेत शेकडो रिक्त पदे आहेत. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात हा खुलासा झाला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देशातील स्वीकृत आणि कार्यरत IAS-IPS अधिका-यांच्या रिक्त पदाबद्दल माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार 1 जानेवारी 2024 पर्यंत देशात भारतीय प्रशासकीय सेवेची (IAS) 1,000 हून अधिक पदे रिक्त आहेत. तर भारतीय पोलीस सेवा (IPS) ची 500 पदे रिक्त आहेत. देशात आयएएस अधिकाऱ्यांसाठी मंजूर पदांची संख्या 6,858 आहे. सध्या आयएएस अधिकाऱ्यांची केवळ 5,542 पदे भरलेली आहेत. बाकी रिकामे आहेत. त्याचप्रमाणे IPS मध्ये मंजूर पदे 5,055 आहेत. केवळ 4,469 आयपीएस अधिकारी कार्यरत आहेत.

रिक्त पदांमध्ये 1,316 IAS पदांचा समावेश आहे, त्यापैकी 794 पदे थेट भरतीने आणि 522 पदोन्नतीने भरली जाणार आहेत. IPS च्या 586 रिक्त पदांपैकी 209 थेट भरतीद्वारे आणि 377 पदोन्नतीद्वारे भरण्यात येणार आहेत. आयएएस आणि आयपीएस व्यतिरिक्त आयएफएस कॅडरमध्येही अधिकाऱ्यांची मोठी कमतरता आहे. 3,193 IFS पदांच्या मंजूर संख्या पैकी 2,151 अधिकारी सेवेत आहेत, 1,042 पदे रिक्त आहेत. 503 थेट भरतीने आणि 539 पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत.
2022 मध्ये किती IAS उमेदवार मिळाले?
केंद्रीय मंत्र्यांच्या उत्तरानुसार नागरी सेवा परीक्षा (CSE) 2022 साठी 75 सामान्य, 45 इतर मागासवर्गीय (OBC), 29 अनुसूचित जाती (SC) आणि 13 अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना IAS वर नियुक्त करण्यात आले. IPS मध्ये 83 सामान्य, 53 OBC, 31 SC आणि 13 ST उमेदवारांचा समावेश होता, तर IFS मध्ये, 43 सामान्य, 51 OBC, 22 SC आणि 11 ST CSE 2024 द्वारे नियुक्त करण्यात आले होते.
UPSC परीक्षा दरवर्षी घेतली जाते
भारतात केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) दरवर्षी IAS-IPS सारखे उच्चस्तरीय अधिकारी प्रदान करण्यासाठी नागरी सेवा परीक्षा (CSE) आयोजित करते. दरवर्षी सुमारे एक हजार उमेदवारांची यूपीएससीमध्ये अंतिम निवड होते.












Click it and Unblock the Notifications