अजमेर दर्गाला पंतप्रधान मोदी पाठविणार चादर; हिंदू सेनेने पाठविले पत्र, म्हणाले, तर परिणाम होईल...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सायंकाळी अजमेर येथील प्रसिद्ध ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गाला चादर पाठविणार आहेत. अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू व भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांच्याकडे मोदी औपचारिक चादर सुपूर्द करतील. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१३ वा उरुस या महिन्यात आहे. त्यानिमित्त ही चादर पाठविली जाणार आहे. दरम्यान, हिंदू सेनेने हा दर्गा नसून येथे शिवमंदीर असल्याचा दावा यापूर्वीच केला असल्याने तेथे वाद आहे.

चादर पाठविण्याची अकरावी वेळ
२०१४ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला आत्तापर्यंत दहा वेळा चादर अर्पण केली आहे. आता अकराव्या वेळी ते अजमेर शरीफ दर्ग्याला चादर पाठवणार आहेत. ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्याला चादर अर्पण करणे भक्ती आणि आदराचे प्रतीक आहे. उरुस दरम्यान चादर अर्पण करण्याची ही प्रथा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे.
काय आहे नेमका वाद
हिंदू सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ख्वाजा मोइद्दीन चिश्ती अजमेर हा दर्गा नसून हे एक शिव मंदीर असल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून चादर पाठवण्याला महत्त्व आहे. हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी पाठवलेल्या पत्रात हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चादर पाठवणं योग्य नाही, असं म्हटलं आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यानं जर पंतप्रधानांकडून चादर पाठवली तर दबाव निर्माण होईल आणि याचिकेवर परिणाम होईल असं विष्णू गुप्ता यांचं मत आहे. या प्रकरणात अजमेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
अनेकांनी पाठविली चादर
अजमेर दर्गा शरीफ येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१३ वा उरूस सुरू होण्यापूर्वी गेल्या आठवड्यात, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चादर पाठवली होती. खादिम सय्यद जिशान चिश्ती यांच्याकडे ही चादर सुपूर्द करण्यात आली होती.अजमेर दर्गा भारताच्या सांस्कृतिक कूटनीतीचाही एक भाग आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही दर्ग्यावर चादर अर्पण केली आहे. परवेझ मुशर्रफ, जनरल झिया-उल-हक, बेनझीर भुट्टो आणि शेख हसीना यांसारख्या नेत्यांसह शेजारील देशांतील इतर राजकीय नेत्यांनी देखील दर्ग्याला भेट दिली आहे.












Click it and Unblock the Notifications