नायबसिंह सैनी 17 ऑक्टोबरला हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, पीएम मोदी उपस्थित राहणार
Nayab Singh Saini oath: हरियाणा विधानसभा निवडणूकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. आता हरियाणा सरकारचा शपथविधी सोहळ्याला बद्दल माहिती समोर आली आहे. नायबसिंह सैनी 17 ऑक्टोबर रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती आहे. नायबसिंह सैनी 17 ऑक्टोबर रोजी पंचकुलामध्ये हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय मंत्री आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, "आम्हाला पंतप्रधानांची मंजुरी मिळाली आहे की मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद 17 ऑक्टोबर रोजी पंचकुलामध्ये शपथ घेणार आहेत. भाजपची परंपरा आहे की, ते जे काही बोलतात तेच करतात, ते तेच सांगतात. विरोधी पक्ष नेते ज्या पद्धतीने तयारी करत होते, जणू ते पंतप्रधान होणार आहेत, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा संपल्या आहेत", असं मनोहरलाल खट्टर म्हणाले आहेत. "

हरियाणा सरकारने शपथविधी सोहळ्याच्या तयारीवर देखरेख ठेवण्यासाठी पंचकुलाच्या उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची 10 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत आदेशात मुख्य सचिव टीव्हीएसएन प्रसाद यांनी सांगितले की, पंचकुला व्यतिरिक्त अतिरिक्त उपायुक्त आणि महानगरपालिका आयुक्त देखील समितीचे सदस्य असतील. विद्यमान मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करून भाजपने विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यामुळे ते नव्या सरकारचेही नेतृत्व करतील, अशी शक्यता आहे.
नायब सिंग सैनी यांच्या निकटवर्तीयाने सांगितले की, मुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्रीही शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. " हा शपथविधी सोहळा एक भव्य कार्यक्रम असणार आहे. ज्यामध्ये संपूर्ण राज्यातील लोक सहभागी होणार आहेत. कारण आम्ही हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली आहे,असं एका भाजप नेत्यांनी सांगितले आहे."
#WATCH | Union Minister & former Haryana CM Manohar Lal Khattar says, "We have received the nod of the PM that on October 17, in Panchkula, the CM and council of ministers will take oath." pic.twitter.com/SLxvKGPWSq
— ANI (@ANI) October 12, 2024
हरियाणा विधानसभेत एकूण 90 जागा आहेत. त्यापैकी भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांच्यासह तीन अपक्ष आमदारांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने 37 जागा जिंकल्या आहेत तर इंडियन नॅशनल लोकदलाने 2 जागा जिंकल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications