कुस्तीपटू विनेश फोगाटने भाजपच्या उमेदवाराला हरवलं, बनली आमदार! विधानसभेतही मिळवला दिमाखदार विजय
Haryana Assembly Election Result Vinesh Phogat won : काँग्रेसला स्वतःच्या जिवावर जे 25 वर्षे करता आलं नव्हतं ते आता कुस्तीपटू विनेश फोगाटने करुन दाखवलं. हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेशने जुलाना मतदारसंघातून जवळपास पाच हजार मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत विनेशने भाजपच्या योगेश कुमार यांचा पराभव केला. विशेष म्हणजे या मतदारसंघातून भाजप व आपसह सुमारे 13 उमेदवार उभे होते.
विनेश फोगाटचा दिमाखदार विजय
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटनं राजकारणाचं मैदानही मारलं. कुस्तीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीत ती जुलाना मतदारसंघातून मैदानात उतरली होती. तिने भाजपच्या योगेश कुमार यांचा पराभव केला. जुलाना मतदारसंघातील विद्यमान आमदारांना फक्त २४७७ मते मिळाली. त्यांचं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली.

जेजेपीचे अमरजीत ढांडा हे 2019 मध्ये आमदार होते. विनेश फोगाटने 5 हजार 763 मतांनी विजय मिळवला. 15 व्या फेरी अखेर तिला 64 हजार 491 मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे योगेश कुमार यांना 58 हजार 728 मते मिळाली. विनेशला 15 पैकी 14 व्या फेरीअखेर 63 हजार 305 मते मिळाली होती. तर विरोधी उमेदवार योगेश कुमार यांना 57 हजार 396 मते मिळाली होती.
विद्यमान आमदाराचं डिपाॅझिट जप्त
योगेश कुमार हे भाजपचा युवा चेहरा होते. ते पक्षाच्या युवा शाखेचे राज्य उपाध्यक्ष आहेत. 35 वर्षीय योगेश यांनी पदवीचं शिक्षण घेतलं आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये जननायक जनता पार्टीच्या अमरजीत ढांडा यांनी विजय मिळवला होता. यावेळी पुन्हा एकदा अमरजीत यांना तिकिट दिलं होतं, पण त्यांना फक्त 2477 मते मिळाली. त्यांचं डिपाँझिटही जप्त झालं. या मतदारसंघाची निवडणूक विनेश फोगाट मैदानात उतरल्यामुळे चांगलीच गाजली होती. भाजपवर नाराजी असलेल्यांनी विनेशला विजयी केल्याचं बोललं जातंय.
बजरंग पुनियाचं ट्विटही व्हायरल
विनेश फोगाटने विजय मिळविल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने विनेशला आपल्या स्टाईलने शुभेच्छा दिल्या. आपल्या सोशल मिडिया आकाऊंटवरुन बजरंगनं पुनियाच्या विजयाचा आनंद साजरा केला. देशाची बेटी विनेश फोगटला विजयासाठी खूप-खूप शुभेच्छा. ही लढत एका जुलाना मतदारसंघासाठी नव्हती किंवा केवळ पक्षांमधली नव्हती. हा लढा देशातील सर्वात जुलमी शक्तीविरुद्ध होता. आणि विनेशने त्यात विजय मिळवला, असं बजरंग पुनियानं म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications