Eid ul Fitr 2026 : यंदा रमजान ईद कधी? सुट्टीची तारीख कोणती असेल; जाणून घ्या सविस्तर माहिती
Eid ul fitr 2026 date moon sighting india : पवित्र रमजान महिन्याची सांगता आता जवळ आली असून, जगभरातील मुस्लीम बांधवांना वेध लागले आहेत ते आनंदाच्या 'ईद-उल-फितर'चे. यंदा ईद नेमकी कधी साजरी होणार, याबाबत सर्वांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. खगोलशास्त्रीय गणना आणि चंद्राच्या स्थितीनुसार, भारतासह जगभरात ईदची तारीख १९ किंवा २० मार्चच्या चंद्रदर्शनावर निश्चित होणार आहे.

चंद्रदर्शनावर का अवलंबून असते ईद?
इस्लामिक कॅलेंडर हे चंद्राच्या गतीवर आधारित असते. रमजानचा ३० दिवसांचा महिना पूर्ण झाल्यानंतर जेव्हा शव्वाल महिन्याचा नवीन चंद्र दिसतो, तेव्हा ईद-उल-फितर साजरी केली जाते. ज्या रात्री चंद्र दिसतो त्याला 'चांद रात' म्हणतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ईद साजरी होते.
सौदी अरबमध्ये कधी साजरी होणार ईद?
खगोलशास्त्रीय अंदाजानुसार, सौदी अरब आणि आखाती देशांमध्ये १९ मार्च २०२६ रोजी चंद्र दिसण्याची दाट शक्यता आहे. जर १९ मार्चला चंद्रदर्शन झाले, तर तिथे २० मार्चला ईद साजरी होईल. मात्र, चंद्र न दिसल्यास ३० रोजे पूर्ण करून २१ मार्चला ईद साजरी केली जाईल.
भारतात ईद कधी साजरी होणार?
भारतात सामान्यतः सौदी अरबच्या एक दिवस उशिरा चंद्र दिसतो. त्यामुळे जर सौदीमध्ये २० मार्चला ईद असेल, तर भारतात २१ मार्च २०२६ रोजी ईद साजरी होण्याची शक्यता जास्त आहे. अंतिम निर्णय हा स्थानिक चंद्र दर्शन समितीच्या (हिलाल कमिटी) घोषणेनंतरच घेतला जाईल.
..मग सुट्टी कधी असेल?
शासकीय सुट्टीचा विचार केला तर ज्या दिवशी चंद्रदर्शन दिसेल त्याच्या दुसर्या दिवशी ईद भारतात साजरी केली जाईल म्हणजेच चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शासकीय सुट्टी असेल. जर चंद्रदर्शन २० मार्चला झाले तर २१ मार्चला ईद साजरी होईल आणि या दिवशी सुट्टी असेल.
बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण
रमजानचे शेवटचे दिवस असल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. नवीन कपडे, अत्तर, सुका मेवा आणि शिरखुर्मासाठी लागणाऱ्या साहित्यांनी दुकाने सजली आहेत. ईदच्या दिवशी सकाळी ईदगाह किंवा मशिदींमध्ये विशेष नमाज अदा केली जाते आणि एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या जातात.
ईदच्या खास शिरखुर्म्याची रेसिपी
१. साहित्य आणि पूर्वतयारी: सर्वप्रथम गरम दुधात केशर भिजवून ठेवा आणि आवडीचे ड्राय फ्रूट्स (बदाम, पिस्ते, काजू, चारोळी) बारीक कापून तुपात हलके तळून घ्या. तसेच, एका पातेल्यात दूध आटवून अर्धे किंवा थोडे घट्ट होईपर्यंत उकळून घ्या.
२. फोडणी आणि मिश्रण : दुसऱ्या कढईत साजूक तूप गरम करून त्यात बारीक शेवया गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत परता. त्यानंतर या शेवयांमध्ये उकळलेले दूध, साखर आणि तळलेले ड्राय फ्रूट्स घालून १०-१५ मिनिटे मंद आचेवर शिजवा. शेवटी वेलची पूड आणि केशराचे दूध घालून गरमागरम किंवा थंड शिरखुर्मा सर्व्ह करा.












Click it and Unblock the Notifications