मोठी बातमी : ईडीच्या पथकावर दगडफेक; छापा टाकून बाहेर पडताच संतप्त जमावाने दगड व वीटा फेकल्या
छत्तीसगडमध्ये ईडीवर हल्ला झाल्याची बातमी आहे. छापा टाकल्यानंतर घराबाहेर पडताना लोकांनी हल्ला केला असल्याचे समजते. छत्तीसगडमधील भिलाई शहरात हा प्रकार घडला. राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल घरातून बाहेर पडत असताना हा हल्ला झाला.

नेमके काय झाले?
ईडीची टीम आज छत्तीसगडमधील भिलाई येथे पोहोचली. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर या पथकाने छापा टाकला. दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक आज सकाळपासून भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल यांच्या घरी छापा टाकत आहे. त्यांच्या घरातून मोठी रक्कम हस्तगत केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र सर्व तपासणी करुन ईडीचे पथक बाहेर पडत असताना ईडीच्या पथकाच्या गाडीवर बघेल यांच्या समर्थकांनी वीटा व दगडांनी हल्ला केला. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नसल्याचे आत्तापर्यंत सांगितले जात आहे.
ईडीची गाडीही रोखली
बघेल यांच्या निवासस्थानाजवळून एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात भूपेश बघेल यांचे समर्थक ईडीची गाडी रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. एका गटाने ईडीच्या गाडीवर दगडही भिरकावले. मात्र ते दगड गाडीपर्यंत पोहोचले नाहीत. या प्रकारानंतर मात्र ईडीचे अधिकारी तत्काळ तेथून गाडीत बसून निघून गेले. भूपेश बघेल यांच्या समर्थकाने एक गाडी ईडीच्या गाडीसमोर लावल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे. मात्र ही गाडी तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या जवानांनी तत्काळ हटवली व ईडीच्या अधिकाऱ्यांच्या गाडीला वाट मोकळी करुन दिली.
ईडी गुन्हा दाखल करणार
या प्रकारानंतर ईडीच्या तपास यंत्रणेने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे नियोजन केले असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र अद्यापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र तो दाखल होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. दरम्यान या प्रकारात कुणीही जखमी झाले नाही. ईडीचा एक अधिकारी बघेल यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत असताना जमलेला संतप्त जमावाने ही दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications