'मुख्यालयातून परवानगी', पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याबद्दल बडतर्फ CRPF जवानांने दिले स्पष्टीकरण
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानाला पाकिस्तानी महिलेशी विवाह लपवल्याच्या आणि तिचा व्हिसा संपल्यानंतरही भारतात ठेवल्याच्या आरोपाखाली सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सीआरपीएफ जवान मुनीर अहमद याने या आरोपांचे खंडन केले असून त्याने मुख्यालयाकडून परवानगी घेतल्यानंतरच हा विवाह केल्याचा दावा केला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असताना ही कारवाई झाली आहे. मुनीर अहमद आता या या कारवाई विरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.
सीआरपीएफने जवान मुनीर अहमद याला 3 मे 2025 रोजी सेवेतून बडतर्फ केले. सीआरपीएफच्या म्हणण्यानुसार, मुनीरने पाकिस्तानी नागरिक मिनल खान हिच्याशी विवाह केला आणि हा विवाह लपवला आहे. तसेच तिचा व्हिसा संपल्यानंतरही तिला भारतात ठेवले. या कृतीला सीआरपीएफने "राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक" ठरवले आहे.

मुनीर हा सीआरपीएफच्या 41 व्या बटालियनमध्ये कार्यरत होता, जो देशातील आंतरिक सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. सीआरपीएफच्या तपासात असे आढळले की, मुनीरने आपल्या विवाहाबाबत वरिष्ठांना पूर्वसूचना दिली नव्हती आणि मिनलचा व्हिसा संपल्यानंतरही तिला आश्रय दिला, जे सेवेच्या नियमांचे उल्लंघन आहे.
31 डिसेंबर 2022 रोजी मुख्यलयाला दिली होती माहिती
मुनीर अहमद याने सीआरपीएफच्या आरोपांचे खंडन केले आहे. त्याने दावा केला की, त्याने मिनल खान हिच्याशी विवाह करण्यापूर्वी मुख्यालयाकडून परवानगी घेतली होती आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. मुनीर म्हणाला, "मी 31 डिसेंबर 2022 रोजी मुख्यालयाला मिनलशी विवाह करण्याच्या माझ्या योजनेबाबत माहिती दिली होती. मी स्वतःसाठी, माझ्या पालकांनी, सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्याचे प्रतिज्ञापत्र यासह सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. 30 एप्रिल 2024 रोजी मला मुख्यालयाकडून परवानगी मिळाली होती." त्याने पुढे सांगितले की, मे 2024 मध्ये त्याने मिनलशी ऑनलाइन निकाह केला आणि त्यानंतर निकाहाची कागदपत्रे, फोटो आणि विवाह प्रमाणपत्र मुख्यालयाला सादर केले होते.
मला खात्री आहे की मला न्याय मिळेल
मुनीरने सांगितले की, मार्च 2025 मध्ये मिनल भारतात आल्यानंतर तिच्यासाठी दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता आणि आपल्या बटालियनच्या डेटा रेकॉर्ड बुकमध्येही या विवाहाची नोंद केली होती. त्याने भोपाळ येथे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या वरिष्ठांसमोर मुलाखती दरम्यानही आपल्या विवाहाबाबत सर्व तपशील उघड केले होते. "मला पहिल्यांदा माझ्या बडतर्फ केल्याची माहिती माध्यमांमधून मिळाली आणि नंतर सीआरपीएफकडून पत्र मिळाले. हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी धक्का आहे. कारण मी परवानगी घेतल्यानंतरच विवाह केला होता," असे मुनीरने सांगितले. त्याने या कारवाई विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असून, "मला खात्री आहे की मला न्याय मिळेल," असे त्याने म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications