Delhi New CM : दिल्लीच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला कोण-कोण उपस्थित राहणार; कोणाला गेले निमंत्रण
Delhi New CM : दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी जोरात सुरू आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील रामलीला मैदानावर तंबू बांधण्याचे काम सुरू झाले आहे. नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक बुधवारी (19 फेब्रुवारी) सायंकाळी आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत निर्णय झाल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री शपथविधी सोहळा पार पडेल. भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ आणि विनोद तावडे हे शपथविधी सोहळ्याच्या व्यवस्थेचे नियोजन करत आहेत.
20 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता रामलीला मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील. पक्षाच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीए नेते, केंद्रीय मंत्री आणि इतर प्रमुख व्यक्ती या समारंभाला उपस्थित राहतील.

धार्मिक नेते अन् संत कार्यक्रमात सहभागी होतील
शपथविधी समारंभाच्या आधी संगीत आणि गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. या समारंभासाठी सुमारे तीस हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. शपथविधी सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि आध्यात्मिक गुरू देखील उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाला उद्योगपती, सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत सहभागी होऊन मदत करणाऱ्या विविध राज्यातील नेत्यांना देखील कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेले आहे.
लाडली बहनासह शेतकऱ्यांनाही निमंत्रण
शपथविधी सोहळ्यासाठी लाडली बहना, दिल्लीचे शेतकरी आणि सुमारे तीस हजार पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. तयारीबद्दल बोलताना भाजप खासदार योगेंद्र चंडोलिया म्हणाले, रामलीला मैदानावर तयारी जोरात सुरू आहे आणि व्यवस्था अंतिम करण्यासाठी सतत बैठका घेतल्या जात आहेत.' 'हा समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत यांचे नावं अग्रस्थानी
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत विजेंदर गुप्ता, रेखा गुप्ता, प्रवेश वर्मा, सतीश उपाध्याय आणि आशिष सूद यांची नावे आहेत. भारतीय जनता पक्ष 27 वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानीत सरकार स्थापन करत आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर झाले ज्यामध्ये भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्षाला फक्त 22 जागा जिंकता आल्या.












Click it and Unblock the Notifications