बघता बघता भलंमोठ्ठं झाडं कोसळलं अन् होत्याचं नव्हतं झालं, थरार कॅमेऱ्यात कैद
दिल्लीत गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा राजधानीतील तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दक्षिण-पूर्व दिल्लीतील कालकाजी परिसरात पावसामुळे एक मोठे कडुलिंबाचे झाड कोसळले. या अपघातात एका बाईकस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना हंसराज सेठी मार्गावर घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती, "बघा, समोर कडुलिंबाचे झाड पडले आहे. कार दबली आहे. बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे," असे म्हणताना ऐकू येत आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला, रस्ते पाण्याखाली गेले आणि गर्दी जमली. स्थानिक नागरिक आणि पोलीस कर्मचारी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
या घटनेनंतर दिल्लीच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आपच्या आमदार आणि दिल्लीच्या माजी मंत्री आतिशी यांनी भाजप सरकारला जबाबदार धरले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिले, "आज हंसराज सेठी मार्गावर पाऊस सुरू असताना झाड कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आणि एक मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. या पावसात भाजपच्या नाकर्तेपणामुळे अनेक दिल्लीकरांनी आपला जीव गमावला आहे. याची जबाबदारी कोण घेणार? मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी तात्काळ पीडब्ल्यूडी मंत्री प्रवेश वर्मा यांना पदावरून हटवावे."
पोलिसांचे म्हणणे काय?
दक्षिण-पूर्व दिल्लीचे डीसीपी हेमंत तिवारी यांनी सांगितले की, या अपघातात दोन लोक जखमी झाले होते. एसीपी कालकाजी यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी त्यांना वाचवून एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले आहे. "अद्याप कोणाच्याही मृत्यूची अधिकृत पुष्टी झालेली नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत मुसळधार पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट
भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी दिल्लीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला असून, दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासांत सकाळी ८:३० वाजेपर्यंत सफदरजंग वेधशाळेत १३.१ मिमी पावसाची नोंद झाली, तर आया नगरमध्ये ५७.४ मिमी, पालममध्ये ४९.४ मिमी आणि लोधी रोडवर १२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे राजधानीचे किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले, जे सामान्यपेक्षा ३.२ अंशांनी कमी आहे. कमाल तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.












Click it and Unblock the Notifications