राजकारणात खळबळ..! दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान सील; पहा नेमकं काय-काय घडलं..?
Delhi CM Awas Seal : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचे सीएम निवासस्थान आज सकाळी सील करण्यात आले. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अरविंद केजरीवाल यांनी हे घर रिकामे केल्यानंतर आतिशी दोनच दिवसांपूर्वी येथे राहायला आल्या होत्या. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी फ्लॅग स्टाफ रोडवरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान सील केले.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घराचा ताबा देताना नियम पाळले गेले नाहीत. आतिशी यांच्याकडे घराच्या चाव्या होत्या, मात्र त्यांना घर वाटपाची अधिकृत कागदपत्रे देण्यात आली नव्हती.

मुख्यमंत्री कार्यालयाचा भाजपवर आरोप
या प्रकारानंतर मुख्यमंत्री अतिशी यांच्या कार्यालयाकडून लगेच उत्तर देण्यात आलं. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, 'इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांना घर सोडण्यास सांगण्यात आले आहे. भाजपच्या सांगण्यावरून एलजींनी सीएम आतिशी यांच्या घरातून बळजबरीने सामान बाहेर काढले. हे मुख्यमंत्री निवासस्थान भाजपच्या एका बड्या नेत्याला देण्याची तयारी सुरू आहे. भाजप 27 वर्षांपासून दिल्लीतील सरकारमधून बाहेर आहे, आता त्यांना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बळकावायचे आहे.
भाजपनेही केला जोरदार पलटवार
मुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या आरोपानंतर दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनीही जोरदार पलटवार केला. ते म्हणाले की, 'अरविंद केजरीवाल यांच्या शीश महलात काहीतरी रहस्य दडलेले आहे. कारण त्यांनी संबंधित विभागाने मागीतल्यावरही बंगल्याच्या चाव्या दिलेल्या नव्हत्या. बंगला सोडल्यानंतर ते पुन्हा घुसण्याचा प्रयत्न का करत आहेत..? असा सवालही सचदेवा यांनी केला.
ते पुढे म्हणाले, 'तुमचे सामान दोन छोट्या ट्रकमध्ये घेऊन तुम्ही चांगले नाटक केले. बंगला अजूनही तुमच्या ताब्यात आहे हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही ज्या प्रकारे बंगला आतिशींना देण्याचा प्रयत्न केला तो घटनाबाह्य होता. आतिशींना आधीच बंगला मिळाला आहे, मग त्या तुमचा बंगला कसा घेतील? त्या बंगल्यात अनेक गुपिते दडलेली आहेत.
दिल्लीत अधिकृत सीएम हाऊसच नाही
राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख या नात्याने केजरीवाल यांना निवासाची व्यवस्था करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. परंतु त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप आपने केला होता. दिल्लीत अधिकृत सीएम हाऊस नाही. केजरीवाल मुख्यमंत्री होण्यापूर्वीही ते वेगवेगळ्या बंगल्यांमध्ये राहत होते.
1993 मध्ये मदनलाल खुराना यांना 33 शामनाथ मार्ग, त्यानंतर साहिब सिंग वर्मा यांना 9 शामनाथ मार्ग आणि शीला दीक्षित यांना पहिल्या टर्ममध्ये AB-17 मथुरा रोड आणि दुसऱ्या टर्ममध्ये 3 मोतीलाल नेहरू मार्ग अशा बंगल्याचे वाटप करण्यात आले होते. दिल्लीत मुख्यमंत्री त्यांच्या सोयीनुसार बंगला निवडतात. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांना वडिलोपार्जित, खासगी किंवा भाड्याच्या घरात राहावे लागते. त्यासाठी वेगळा गृहनिर्माण भत्ता दिला जात नाही. दरमहा दिलेल्या एकूण रकमेत गृहनिर्माण भत्ता समाविष्ट केला जातो.












Click it and Unblock the Notifications