दिल्ली विधानसभेआडून पार्थ पवारांचे रि-लाँन्चिंग झालेय? अजित पवारांच्या डोक्यात नेमके काय?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी नव्या दमाने लढणार आहे. या निवडणुकीसाठी अजित पवार गटाने आपले उमेदवार जाहीर केले असून, काल गुरुवारी त्यांनी आपल्या २० स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली. या स्टार प्रचारक यादीत दोन मुद्दे प्रकर्षाने जाणवले. याच दोन्ही मुद्यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

पार्थ पवारांचे रि-लाँन्चिंग
राष्ट्रवादी एकसंघ होती, त्यावेळी पार्थ पवारांना पक्षात जास्त महत्व नव्हते. २०१९ निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पार्थ पवार पराभूत झाल्यानंतर त्यांची राष्ट्रवादीत जास्त दखल घेतली जात नव्हती. मात्र आता अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पार्थ पवारांना अजित पवारांनी वेगळी जबाबदारी दिल्याचे दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पार्थ पवारांना स्टार प्रचारक बनविल्यामुळे अजित पवार त्यांचे यानिमित्ताने रि-लाँन्चिंग करत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
पार्थ कौशल्य दाखवणार?
दिल्ली विधानसभेसाठी अजित पवार गटाने ११ उमेदवार उभे केले आहेत. पार्थ पवारांना आता या उमेदवारांना निवडून आणत स्वतःतील नेतृत्वगुण व प्रचार कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. ही निवडणूक त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळेच अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचे स्थान अधिक ठळक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
राज्यातही सक्रीय होणार?
अजित पवार गटाने जाहिर केलेल्या यादीची दोन वैशिष्ट्ये होती. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या यादीत पार्थ पवारांचे स्थान आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रातील एकाही मंत्र्याला न दिलेले स्थान. दिल्ली विधानसभेत मोठी जबाबदारी दिल्यानंतर अजित पवार आता पार्थ पवारांना थेट महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठे स्थान देतील, असे काहींचे म्हणणे आहे. पार्थ पवारांच्या रि-लाँन्चिंगसाठी दिल्ली विधानसभा ही रंगीत तालीम असेल, असेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications