Haryana Election : भाजपने तिकीट नाकारले;देशातील सर्वात श्रीमंत महिलेने अपक्ष जिंकली निवडणूक
Country Richest Woman Savitri Jindal Again Became Haryana mla : आज मंगळवारी हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले. सकाळपासून एक-एक निकाल हाती येऊ लागला. हरियाणातील हिसार मतदारसंघ सध्या देशात सर्वात जास्त चर्चेत आला होता. कारण तेथे भारतातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या सावित्री जिंदल या निवडणुकीतून आपलं नशिब आजमावत होत्या. सावित्री जिंदल यांनी अगोदर भाजपकडून तिकीटाची मागणी केली होती. मात्र त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवत, काँग्रेसच्या राम निवास राणा यांचा 20 हजार मतांनी पराभव केला.

देशातील सर्वात श्रीमंत महिला रिंगणात
फोर्ब्सच्या आकड्यांनुसार, सावित्री जिंदल यांच्याकडे सध्या 3.65 लाख कोटी रुपयाची संपत्ती आहे. सावित्री जिंदल या जिंदल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी हिसार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या बँक खात्यात किती पैसे जमा आहेत, या विषयी माहिती दिली होती. त्या शपथपत्रानुसार, सावित्री जिंदल यांच्या बँक खात्यात 4.09 कोटी रुपये जमा आहेत. त्यांच्याकडे 165 कोटी रुपयांचे शेअर आणि जवळपास 20 कोटी रुपयांचे दागिने आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे जवळपास 80 कोटी रुपयांची शेतजमीन आहे.
भाजपने नाकारली होती उमेदवारी
सावित्री जिंदल यांचे पुत्र खासदार नवीन जिंदल यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी कुरुक्षेत्र येथून लोकसभा निवडणूक लढवत विजय संपादीत केला होता. नवीन जिंदल यांनी भाजपाच प्रवेश केल्यानंतर तीन दिवसांनी सावित्री जिंदल यांनीही भाजपात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आपल्याला उमेदवारीचं तिकीट देईल, असं सावित्री जिंदल यांना वाटलं होतं. पण पक्षाने माजी खासदार तथा मंत्री डॉ. कमल गुप्ता यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या सावित्री जिंदल यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा आता विजय झाला आहे.
जिंदल यांनी चार उमेदवारांना दिली टक्कर
सावित्री जिंदल यांची हिसार विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, जजपा आणि आपच्या उमेदवारांसोबत लढाई होती. त्या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार डाँ. कमल गुप्ता यांना पक्षाने पुन्हा संधी दिली होती. तर काँग्रेसकडून राम निवास राणा हे उमेदवार होते. जजपाकडून रवि अहूजा आणि आम आदमी पक्षाकडून संजय सतरोदिया उमेदवार होते. अखेर या मतदारसंघाचा निकाल आता समोर आला आहे. सावित्री जिंदल यांचा तब्बल 20 हजार मतांनी विजय झाला आहे.












Click it and Unblock the Notifications