सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार..? काँग्रेसचा नेमका आरोप काय..?
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी काँग्रेसने सुरु केल्याचे समजते. हा प्रस्ताव आणण्याचा काँग्रेसचा विचार आहे. विरोधी इंडिया आघाडीतील इतर पक्षही त्याला पाठींबा देतील, अशाही चर्चा सुरु झाल्या आहेत. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव हेही या प्रस्तावाला पाठींबा देणार आहेत.

राज्यसभेत आज प्रचंड गदारोळ
सोमवारी राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांत चांगलेच वाजले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांवर विदेशी संस्था आणि लोकांच्या माध्यमातून देशाचे सरकार आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, एनडीएच्या खासदारांनी केला. तर दुसरीकडे काँग्रेससह विरोधकांनी अदानी समूहाशी संबंधित मुद्दा उपस्थित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तीन तासानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाले. मात्र तेव्हाही सभागृहात गोंधळ सुरूच होता.
संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज गोंधळ पहायला मिळाला. अनेकदा कामकाज तहकूब करावे लागले. मात्र तरीही हा गोंधळ थांबला नाही. त्यानंतर कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षातील काही सदस्य आपल्या जागेवरून पुढे आल्याने जास्त गोंधळ वाढला. त्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृह नेते जेपी नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी त्यांच्या चेंबरमध्ये बैठक घेतली. उद्या मंगळवारी सकाळी 10:30 वाजता सभापती पुन्हा त्यांच्या चेंबरमध्ये अशी बैठक घेणार आहेत. सर्व सदस्यांना संविधानाच्या शपथेचा काळजीपूर्वक विचार करण्याचे आवाहन, धनखड यांनी केले.
काँग्रेस आणणार अविश्वास प्रस्ताव
विरोधी पक्षाची इंडिया आघाडीकडून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने हा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याला इंडिया आघाडीच्या इतर पक्षांचाही पाठिंबा मिळू शकतो. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून जगदीप धनखड हे पक्षपात करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. ते विरोधी पक्षांच्या खासदारांना संधी देत नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप विरोधकांनी केला. ममता बॅनर्जी यांची टीएमसी, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष या प्रस्तावाला पाठिंबा देणार आहे. राज्यघटनेच्या कलम ६७ (बी) अंतर्गत विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत.












Click it and Unblock the Notifications