दिवाळीनिमित्त मध्य रेल्वे महाराष्ट्रातून ९४४ विशेष ट्रेन चालवणार! कोणत्या मार्गावर किती गाड्या? वाचा
Central railway maharashtra diwali chhath 944 special trains : मध्य रेल्वेने दिवाळीआधी प्रवाशांसाठी गोड बातमी दिली आहे. सण, उत्सवाच्या काळात प्रवाशांना प्रवासासाठी होणार त्रास आणि रेटारेटी, गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे.
दिवाळी, छट या मोठ्या सण उत्सव काळात मध्य रेल्वे महाराष्ट्रातून ९४४ विशेष गाड्या चालवणार आहे. खास प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने या सेवा जाहीर केल्या आहेत.

महाराष्ट्रातून कुठे -कुठे करता येईल प्रवास
विशेष गाड्या सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत असतील. महाराष्ट्र ते दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, केरळ आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांना या विशेष गाड्या जोडतील. म्हणजेच प्रवाशांना या राज्यात प्रवास करणे सोपे ठरेल.
या आहेत लांब पल्ल्याच्या विशेष गाड्या
पुणे-हजरत निजामुद्दीन : ५६ विशेष गाड्या चालवल्या जातील. यात साप्ताहिक आणि द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट गाड्यांचा समावेश असेल.
कोल्हापूर-मुंबई CSMT : मिराज, सांगलीमार्गे २० साप्ताहिक विशेष गाड्या धावतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)-तिरुवनंतपुरम् : कोकण मार्गे २० साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जातील, ज्या रत्नागिरी, मडगाव, मंगळूर आणि एर्नाकुलम यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील.
पुणे-सांगानेर (राजस्थान) : २० साप्ताहिक सुपरफास्ट गाड्या वडोदरा, रतलाम, कोटा या मार्गाने धावतील.
CSMT-गोरखपूर : झाँसी, कानपूर, आणि लखनऊ मार्गे १३२ दैनिक विशेष गाड्या असतील.
पुणे-गोरखपूर : भोपाळ आणि झाँसी मार्गे १३० दैनिक रेल्वे सेवा उपलब्ध असतील.
LTT-दानापूर : जबलपूर आणि प्रयागराज मार्गे १३४ दैनिक सेवा चालवल्या जातील.
पुणे-दानापूर : सतना आणि पं. दीन दयाल उपाध्याय जंक्शन मार्गे १३४ दैनिक गाड्या असतील.
नागपूर-समस्तीपूर : गोरखपूर आणि मुझफ्फरपूर मार्गे २० साप्ताहिक सेवा उपलब्ध असतील.
इतर गाड्या : यात LTT-नागपूर (२० सेवा), नागपूर-पुणे (२० सेवा), आणि LTT-सावंतवाडी रोड (८ सेवा) यांचा समावेश आहे.
कमी अंतराच्या विशेष गाड्या अशा आहेत..
लातूर-हडपसर : कुर्दुवाडी मार्गे ७४ गाड्या आठवड्यातून चार दिवस चालवल्या जातील.
दौंड-कलबुर्गी : १३६ दैनिक आणि द्वि-साप्ताहिक अनारक्षित गाड्या उपलब्ध असतील.
LTT-लातूर : दौंड आणि कुर्दुवाडीमार्गे २० साप्ताहिक गाड्या धावतील.
बुकिंग झाली सुरु लवकर सीट आरक्षण करा
- मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्यांसाठी ८ सप्टेंबर २०२५ पासून बुकिंग सुरू झाले आहे.
- प्रवासी पीआर (PR) काउंटर आणि आयआरसीटीसी (IRCTC) च्या अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वरून तिकीट आरक्षित करू शकतात.
- गाड्यांच्या थांब्यांची आणि वेळेची सविस्तर माहिती NTES अॅप किंवा enquiry.indianrail.gov.in वर उपलब्ध आहे.












Click it and Unblock the Notifications