अरुणाचल प्रदेशात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत; सिक्कीम एसकेएमने जिंकले
Mumbai: नुकत्याच झालेल्या निवडणुकांत भाजपचा विजयाचा वारू उधळण्यास सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे तर सिक्कीम एसकेएमने निर्णायक बहुमताचा आकडा पार केला आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. त्यापैकी १० जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मुख्यमंत्री पेमा खंडू पुन्हा विजयी झाले आहेत. २०१९ साली या राज्यात भाजपला ४१ जागा मिळाल्या होत्या. भाजपने मागील यश कायम ठेवल्याचे दिसून येत आहे.

स्पष्ट बहुमत निश्चित होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पारंपारिक वाद्यांसह जल्लोष करण्यास सुरुवात केली. भाजपने राज्यातील सर्व ६० जागांवर उमेदवार उभे केले होते.
कॉंग्रेसची वाताहत
अरुणाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसची वाताहत झाली आहे. दुपारी उशिरापर्यंत कॉंग्रेस उमेदवार फक्त एका जागेवर आघाडीवर होता. भारतीय जनता पक्षा पाठोपाठ एनपीपी हा दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. दरम्यान, या भाजपच्या या यशामुळे अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा एकदा पेमा खंडू यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.
तर दुसरीकडे सिक्कीम या ईशान्येकडील आणखी एका राज्यात एसकेएम या पक्षाने पुन्हा सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. सिक्कीममध्ये विधानसभेच्या ३२ जागा असून एसकेएम पक्षाने २० जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला सिक्कीममध्येही सत्ता मिळवता आलेली नाही.
मतदानाची सर्वाधिक आकडेवारी
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम ही मतदानाच्या सर्वाधिक टक्क्यासाठीओळखली जाणारी राज्ये आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये यावेळी तब्बल ८२ टक्के मतदान झाले होते तर सिक्कीम मध्ये ही आकडेवारी ७९ टक्के इतकी आहे.
कोण आहेत पेमा खंडू ?
१९७९ साली जन्मलेले पेमा खंडू हे मुळचे काँग्रेसी आहेत. २०१६ मध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवले. २०१९ साली त्यांनी भाजपला पुन्हा शानदार विजय मिळवून दिला. आणि आता २०२४ मध्येही ते भाजपला विजय मिळवून देत आहेत. त्यांचे वडील दोरजी खंडू हे देखील अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
दिल्ली विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या खंडू यांनी २००० मध्ये कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विविध पदांवर त्यांनी काम केले. २०११ साली त्यांची आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली होती. २०१६ साली अवघ्या ३७ व्या वर्षी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. आणि त्या नंतर् काही महिन्यांतच ४३ आमदारांसह त्यांनी भाजपात प्रवेश केला. खंडू यांना फुटबाल, क्रिकेट आदी खेळांची आवड आहे.












Click it and Unblock the Notifications