'या' भाजप नेत्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, नेमकं प्रकरण काय?
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दिलीप घोष यांचं लग्न होऊन काही दिवसच उलटले आहेत, याच दरम्यान त्यांच्या कुटुंबाला एका दुःखद प्रसंगाचा सामना करावा लागत आहे.. घोष यांच्या पत्नी रिंकू मजुमदार यांना पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे.

मंगळवारी सकाळी कोलकात्यातील न्यू टाउन परिसरातील २६ वर्षीय प्रीतम मजुमदार यांचा मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला. दिलीप घोष आणि रिंकू मजुमदार यांच्या लग्नाला काही आठवडेच झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रीतमच्या मृत्यूने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
न्यू टाउनमधील फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला
प्रीतमचा मृतदेह रिंकू मजुमदारच्या फ्लॅटमध्ये सापडला. पोलिसांना माहिती मिळेपर्यंत कुटुंबीयांनी त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले होते, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला
डॉक्टरांनी सांगितले की प्रीतमला रुग्णालयात आणले तेव्हापर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या माहितीवरून मृत्यूचे कारण काय होते हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि प्रत्येक पैलूचा तपास केला जात आहे.
रिंकूचे दुसरे तर घोष यांचे पहिले लग्न
दिलीप घोष) यांनी गेल्या महिन्यात भाजप महिला मोर्चाच्या नेत्या रिंकू मजुमदार यांच्याशी लग्न केले. घोष यांचे हे पहिले लग्न होते, तर रिंकू यांचे हे दुसरे लग्न आहे. रिंकू यांचे वय सुमारे ५० असल्याचे सांगितले जाते.
कोणतीही औपचारिक तक्रार प्राप्त झाली नाही
सध्या, रिंकू मजुमदार किंवा प्रीतमच्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याकडून पोलिसांना कोणतीही लेखी तक्रार मिळालेली नाही. यामुळे, पोलिस सर्व बाजूंनी मृत्यूचे कारण तपासत आहेत.
घोष यांनी भाजपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे
दिलीप घोष हे बऱ्याच काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत. त्यांनी २०१५ ते २०२१ पर्यंत पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने राज्यात १८ जागा जिंकल्या. नंतर त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले. प्रीतमच्या मृत्यूमागील खरे कारण काय आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल. सध्या पोलिस तपासात व्यस्त आहेत आणि कुटुंबाचीही चौकशी केली जात आहे.
आजाराने ग्रस्त होता प्रीतम
कुटुंबातील सदस्यांच्या मते, प्रीतम शारीरिक आजारही होता, ज्यासाठी त्याला औषध घ्यावे लागत होते. पण त्याची आई रिंकू म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून मुलगा श्रींजय उर्फ प्रीतम त्याची औषधे व्यवस्थित घेत नव्हता. दीड वर्षांपूर्वी तो बेशुद्ध पडला. त्याला न्यूरो मेडिसिनही देण्यात आले. काही दिवस त्याने औषध नीट घेतले नाही. तो काहीच बोलला नाही.
त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो रिंकू यांचा एकुलता एक मुलगा होता. दिलीप घोष म्हणाले की, हे त्यांचे दुर्दैव आहे की त्यांना मुलगा झाल्याचे सुख मिळाले नाही आणि त्यांनी त्यांचा मुलगा गमावला.












Click it and Unblock the Notifications