भारताचा मोठा विक्रम, भारत ठरला जगातील चौथ्या क्रमाकांचा देश; जाणून घ्या सविस्तर
भारताने परकीय चलन साठ्याच्या बाबतीत पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. ऑक्टोबर 2024 नंतर प्रथमच देशाचा परकीय चलन साठा 700 अब्जच्या पुढे गेला असून, गेल्या नऊ महिन्यांतील हा सर्वाधिक स्तर आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 58.39 अब्ज इतकी वाढ भारताच्या परकीय साठ्यात झाली आहे. हे लक्षात घेतलं, तर जगातील अनेक देशांचा एकूण परकीय साठा याच्या आसपासदेखील नाही. सध्या भारत सर्वाधिक परकीय साठा असणाऱ्या देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 27 जून रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलन साठ्यात 4.84 अब्जने वाढ होऊन तो 702.78 अब्जवर पोहोचला. ऑक्टोबर 2024 मध्ये भारताने शेवटचा 700 अब्जचा टप्पा गाठला होता. त्यामुळे तब्बल नऊ महिन्यांनंतर भारताने पुन्हा एकदा हा उच्चांक ओलांडला आहे.
भारताने या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची कामगिरी साध्य केली आहे. 704.88 अब्ज हा भारताचा आजवरचा सर्वकालीन उच्चांक होता, जो सप्टेंबर 2024 मध्ये नोंदवण्यात आला होता. त्यानंतर एका टप्प्यावर साठा 697.93 अब्जपर्यंत घसरला होता. मात्र, आताच्या वाढीमुळे भारत केवळ 2 अब्ज दूर आहे आपल्या ऑल टाइम हायपासून. असा अंदाज वर्तवला जात आहे की, पुढील आठवड्यात भारत हा विक्रमही मोडेल.
फॉरेन करंसी अॅसेट्स म्हणजेच परकीय चलन मालमत्तेत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, 27 जून रोजी संपलेल्या आठवड्यात या मालमत्तेत 5.75 अब्जची वाढ झाली असून, त्याचा एकूण आकडा 594.82 अब्जवर पोहोचला आहे. हे चलन बँकेच्या नियंत्रणाखाली असलेले ठेवी आणि विदेशी चलनात असलेली गुंतवणूक यांना दर्शवते.
दुसरीकडे, देशाच्या सोन्याच्या साठ्यात मात्र किंचित घट झाली आहे. 1.23 अब्ज इतकी घसरण नोंदवण्यात आली असून, त्यामुळे सध्याचा सोन्याचा साठा 84.5 अब्जवर आला आहे. यासोबतच, विशेष ड्रॉइंग राइट्स (SDR) मध्ये 158 दशलक्षची वाढ झाली असून, SDR साठा 18.83 अब्जवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे असणाऱ्या भारताच्या राखीव निधीतही 176 दशलक्षची वाढ नोंदली गेली असून, तो साठा आता 4.62 अब्जवर पोहोचला आहे.
एकंदरीत, भारताचा परकीय चलन साठा आता पुन्हा एकदा स्थैर्याच्या मार्गावर असून, जागतिक आर्थिक संदर्भात देशाची स्थिती आणखी मजबूत होत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.












Click it and Unblock the Notifications