'Air Indiaचे विमान क्रॅश करेन', बंगळुरूच्या डॉक्टरने दिली पायलटला धमकी; मग त्यानंतर घडले धक्कादायक
Air India Flight Bengaluru News : बंगळुरुहून सुरतला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये (AI Flight IX2749) एका 36 वर्षीय महिला डॉक्टरने पायलटला विमान क्रॅश करण्याची धमकी दिली, त्यानंतर एकच खळबळ उडाली. महिला डॉक्टरचे नाव व्यास हिरल मोहनभाई असे आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिची बॅग फ्लाइटमध्ये न ठेवल्याने तिने गोंधळ घातला. ही घटना मंगळवार 17 जून 2025 ची आहे, परंतु त्यासंदर्भात रिपोर्ट आता समोर आला आहे.
महिला डॉक्टर व्यास हिरल मोहनभाई यांनी त्यांची अतिरिक्त बॅग ठेवण्यावरून केबिन क्रूशी वाद घातला आणि धमकी दिली की, "जर माझी बॅग योग्य ठिकाणी ठेवली नाही तर मी विमान क्रॅश करेन". या धमकीवजा इशाऱ्यामुळे विमान उड्डाणास सुमारे दोन तास उशीर झाला तर सुरक्षेबाबत विशेष काळजी घेतली गेली.

धमकी देणारी महिला डॉक्टर कोण आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरचे नाव व्यास हिरल मोहनभाई असे आहे. त्या बंगळुरुमधील येलहंका जवळील शिवनहल्ली येथील आहे आणि त्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. या फ्लाइटमध्ये ती एकटीच प्रवास करत होती आणि तिच्याकडे दोन बॅगा होत्या.
फ्लाइटमध्ये बॅग ठेवण्यावरून सुरू झाला वाद!
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डॉ. व्यास हिरल मोहनभाई यांनी चेक-इन काउंटरकडे दुर्लक्ष करून फ्लाइटमध्ये दोन्ही बॅगा सोबत नेण्याचा आग्रह धरला. फ्लाइटमध्ये चढल्यानंतर, तिने एक बॅग क्रू केबिनजवळ पहिल्या रांगेत ठेवली आणि दुसरी बॅग तिच्या सीट 20F वर नेली. जेव्हा केबिन क्रूने तिला सांगितले की बॅग सीटच्या वरच्या ओव्हरहेड डब्यात ठेवावी लागेल, तेव्हा तिने नकार दिला.
त्याऐवजी क्रूला तिची बॅग तिच्या सीटवर पोहोचवण्यास सांगितले. त्यामुळे त्या दोघींमध्ये वाद वाढला. परिस्थिती आणखी बिकट होत गेली. वारंवार समजावून सांगूनही, महिला डॉक्टरने क्रूचे ऐकले नाही आणि कथितपणे अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. जेव्हा इतर प्रवाशांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्यांच्यावर ओरडण्यासही सुरुवात केली.
तेव्हा रागाच्या भरात बोलता बोलता महिला डॉक्टरने इशारा दिला की, माझी बॅग माझ्याजवळ ठेवली नाही तर "मी फ्लाइट क्रॅश करेन" अशी धमकी दिली. त्यामुळे परिस्थिती अधिक अवघड झाली. पायलट आणि क्रूने तात्काळ सीआयएसएफ आणि सुरक्षा पथकाला माहिती दिली, त्यानंतर तिला विमानातून खाली उतरवण्यात आले.
महिला डॉक्टरला कोणत्या कलमाअंतर्गत झाली अटक?
KMIA पोलिसांच्या अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी डॉक्टरला विमानातून खाली उतरवले आणि तिला अटक केली. दुपारी 2:45 वाजता हा वाद सुरू झाला तो संध्याकाळी 5:30 पर्यंत चालला होता.
महिला डॉक्टरवर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(4): निनावी संदेशाद्वारे गुन्हेगारी धमकी देण्याचा गुन्हा, कलम 353(1)(B) : सार्वजनिक त्रासदायक विधाने करणे आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा कायद्याच्या कलम 3(1)(A) : विमानातील कोणत्याही व्यक्तीविरुद्ध हिंसक कृत्ये करणे, ज्यामुळे विमानाची सुरक्षितता धोक्यात येते.
पोलिसांनी म्हटले आहे की, महिला डॉक्टरच्या वर्तनामुळे उर्वरित प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली होती. प्रकरण आता तपासाधीन आहे आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की अशा घटना उड्डाण सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर मानल्या जातात. त्यामुळे अखेर ही कारवाई करावी लागली.












Click it and Unblock the Notifications