कुवेतमधून ओवेसींनी पाकला धुतलं, ऑपरेशन सिंदूरवर काय म्हणाले ओवेसी?
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे खासदार असदुद्दीन ओवैसी सध्या कुवेत दौऱ्यावर असून, तिथे भारतीय प्रतिनिधीमंडळाचा भाग म्हणून त्यांनी भारतीय प्रवाशांशी संवाद साधला. या संवादादरम्यान ओवैसींनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बनावट फोटो प्रकरणावरून पाकिस्तानची खिल्ली
ओवैसी म्हणाले की, "पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अलीकडे एक फोटो प्रदर्शित केला होता. त्यात 'ऑपरेशन बनयान-उल-मर्सूस' च्या यशाचा दावा करण्यात आला होता. मात्र ती प्रतिमा ही २०१९ मध्ये चीनच्या रॉकेट
आर्टिलरी कवायतीची होती."
"नकल करण्यासाठी अक्कल लागते, पण या लोकांकडे तीही नाही. भारताशी स्पर्धा करायची, पण बनावट प्रतिमा वापरून खोटं यश दाखवायचं - हे पाकिस्तानकडून नेहमीच पाहायला मिळतं," असं ओवैसी म्हणाले.
"पाकिस्तानला पुन्हा FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकलं पाहिजे"
ओवैसी यांनी पाकिस्तानवर आर्थिक निर्बंधांची गरजही व्यक्त केली. "पाकिस्तान IMF कडून घेतलेल्या कर्जाचा वापर दहशतवादी संघटनांना पोसण्यासाठी करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर आर्थिक कारवाई होणं आवश्यक आहे. FATF (Financial Action Task Force) ने पाकिस्तानला पुन्हा ग्रे लिस्टमध्ये टाकणं गरजेचं आहे," अशी मागणी त्यांनी केली.
"भारताचे मुस्लीम अधिक प्रामाणिक"
पाकिस्तानकडून धर्माच्या नावावर केले जाणारे दावे फेटाळून लावत ओवैसी म्हणाले, "पाकिस्तान मुस्लीम देश असल्याचा दावा करत असतो. पण भारतात मुस्लीम लोकसंख्या जास्त आहे आणि आम्ही पाकिस्तानपेक्षा अधिक प्रामाणिक आहोत. आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि आमचं कर्तव्य देशप्रेम आहे."
'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर वक्तव्य
ओवैसींचं हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे जेव्हा भारताने २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. पाकिस्तानने त्यावर "बनयान" नावाच्या कारवाईचा दावा करत बनावट फोटो सादर केला होता.
सोशल मीडियावर पाकिस्तानची जोरदार फजिती
या प्रकरणानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानची जबरदस्त फजिती झाली आहे. अनेक युजर्सनी २०१९ च्या मूळ चिनी फोटोसह पाकिस्तानच्या खोटेपणावर टीका केली आहे.












Click it and Unblock the Notifications