Amit Shah: अमित शहांकडून महाराष्ट्रातील या दोन जमिनींचा उल्लेख, वक्फ विधेयकावरुन विरोधकांना सुनावलं
Amit Shah On Waqf Amendment Bill 2025 : मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले असून, त्यावर बुधवारी दुपारी 12 वाजेपासून चर्चा सुरू आहे. विविध पक्षाच्या वतीने त्यावर मत मतांतरे मांडली जात आहेत. अनेकांनी हे विधेयक म्हणजे मुस्लीम समाजाच्या हक्कावर गदा आणणे आहे, असा उल्लेख केला. दरम्यान, संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण ताकदीने त्याचे समर्थन केले. त्यांनी वक्फ बोर्ड दुरुस्ती का करणे गरजेचे आहे, यावर आपली भूमिका स्पष्ट केली. तर बोलताना महाराष्ट्रातील दोन जागेंचा उल्लेख देखील त्यांनी केला.
काय म्हणाले अमित शहा?
अमित शहा लोकसभेत बोलताना म्हणाले की, माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्याने मांडलेल्या विधेयकाचे मी समर्थन करतो. दुपारी 12 वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी लक्षपूर्वक ऐकत आहे. मला वाटते की अनेक सदस्यांचे खरोखरच किंवा राजकीय कारणांमुळे अनेक गैरसमज या विधेयकाबाबत निर्माण झालेले आहेत.

कंकलेश्वर मंदिराची 12 एकर जमीन..
अमित शहा पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील दोन गावांमधील मंदिरांवर केलेल्या दाव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील वडांगे गावातील महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला. तसेच बीडमधील कंकालेश्वर मंदिराची 12 एकर जमीन वक्फ बोर्डाने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती.
तुष्टीकरणासाठी एका रात्रीत अतिरेकी स्वरुन दिले गेले
अमित शहा म्हणाले की, 2013 मध्ये, तुष्टीकरणासाठी वक्फला एका रात्रीत अतिरेकी स्वरूप देण्यात आले. यामुळे, दिल्लीतील 123 सरकारी मालमत्ता वक्फला देण्यात आल्या. दिल्ली वक्फ बोर्डाने उत्तर रेल्वेची जमीन वक्फच्या नावावर घोषित केली. हिमाचल प्रदेशात, वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केलेल्या जमिनीवर बेकायदेशीर मशिदी बांधण्यात आल्या. तामिळनाडूमध्ये, 1500 वर्षे जुन्या मंदिराची जमीन वक्फला देण्यात आली.
शाहांनी सांगितला वक्फ शब्दाचा अर्थ
वक्फचा अर्थ आणि त्याचा इतिहास स्पष्ट करताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, वक्फ हा एक अरबी शब्द आहे, ज्याचा उल्लेख काही हदीसांमध्ये आहे. त्यांनी सांगितले की, वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावाने मालमत्ता दान करणे आणि त्याची प्रथा इस्लामचे दुसरे खलीफा उमर यांच्या काळात सुरू झाली."
गैर मुस्लिमांना यात समाविष्ट केले जाणार नाही
संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, वक्फशी संबंधित धार्मिक कार्यात गैर-मुस्लिमांना समाविष्ट केले जाणार नाही. परंतु, काही लोक या मुद्द्यावर गैरसमज पसरवून आपली मतपेढी सुरक्षित करण्यासाठी राजकारण करत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, वक्फ बोर्ड आणि वक्फ कौन्सिलमधील बिगर मुस्लिम सदस्य केवळ काम योग्यरित्या होत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी असतील.












Click it and Unblock the Notifications