अहमदाबाद विमान दुर्घटनेत पंढरपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू; मुलाच्या भेटीची इच्छा अपूर्ण
गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज दुपारी एक अत्यंत भीषण विमान दुर्घटना घडली. लंडनकडे निघालेलं एअर इंडियाचं AI171 हे बोईंग 787 विमान टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच नियंत्रण गमावून थेट एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळलं. या दुर्घटनेत पंढरपूरमधील पवार दाम्पत्याचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रासह देशभरातून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

पंढरपूरच्या पवार दाम्पत्याचा अंत
या दुर्घटनेत महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील हातीद गावचे रहिवासी महादेव पवार (वय ६७) आणि आशा पवार (वय ५५) यांचा मृत्यू झाला. हे दाम्पत्य लंडनला आपल्या मुलाकडे जात होते. त्यांच्या कुटुंबातील दुसरा मुलगा सध्या अहमदाबादमध्ये व्यवसाय करत असून, या प्रवासानंतर दोघेही काही महिने लंडनमध्ये राहणार होते.
नागपूरच्या कुटुंबावरही काळाचा घाला
याशिवाय, नागपूरच्या क्वेटा कॉलनी, रामपेठ येथील यशा कामदार मोढा आणि त्यांचा मुलगा रुद्र मोढा हेही या विमानात प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच त्यांचं संपूर्ण कुटुंब तातडीने अहमदाबादला रवाना झालं आहे. दोघांचाही मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
टेकऑफनंतर काही मिनिटांतच दुर्घटना
AI171 हे विमान दुपारी १.३१ वाजता अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे उड्डाण करत होतं. मात्र उड्डाणानंतर अवघ्या सात मिनिटांत, म्हणजे १.३८ वाजता, विमानाचा सिग्नल गायब झाला. काही क्षणांतच ते एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. प्राथमिक तपासणीत टेकऑफदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे संकेत आहेत. अपघातानंतर तिथे प्रचंड आगीचा भडका उडाला.
प्रवाशांची स्थिती व हानीचा आढावा
या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. या अपघातात केवळ एक प्रवासी बचावल्याची माहिती आहे, उर्वरित सर्व जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वैमानिक, १० केबिन क्रू सदस्य आणि वैद्यकीय महाविद्यालयातील ३ विद्यार्थी देखील आहेत, जे वसतिगृहात होते.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन
या अपघाताने आणखी एक धक्का बसला तो म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही या विमानात होते. अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी यासंदर्भात अधिकृतपणे माहिती दिली असून रुपाणी यांचं निधन झाल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या निधनाने गुजरातच्या राजकारणात शोककळा पसरली आहे.
पंतप्रधान व गृहमंत्र्यांकडून प्रतिक्रिया
या दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संपर्क साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या घटनेची माहिती देण्यात आली असून, संपूर्ण घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.












Click it and Unblock the Notifications