अहमदाबाद विमान दुर्घटनेवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, पंतप्रधान म्हणाले...
अहमदाबादमध्ये 12 जून रोजी घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेने देशभरात खळबळ उडवली आहे. एअर इंडियाच्या लंडनकडे जाणाऱ्या AI171 या फ्लाइटने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांतच तांत्रिक बिघाडामुळे नियंत्रण गमावून मेघाणी नगर परिसरातील एका निवासी वसतिगृहावर कोसळले.

या भयावह अपघातात आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. त्यामध्ये 241 प्रवासी आणि 24 जण त्या परिसरातील स्थानिक रहिवासी होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली दुर्घटनास्थळी भेट
घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादला येऊन अपघातस्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी सुमारे 20 मिनिटं घटनास्थळावर थांबून अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली आणि बचावकार्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या. त्यानंतर मोदींनी स्थानिक रुग्णालयात भेट देऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. रुग्णालयात मोदी सुमारे 10 मिनिटे उपस्थित होते.
शाहबाज शरीफ यांचा शोकसंदेश
या दुर्घटनेने शेजारील पाकिस्तानमधील नागरिकांनाही हादरवले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून या घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं,
"अहमदाबादजवळ झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या बातमीने आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत. ही अत्यंत वेदनादायक घटना असून, अपघातात जीव गमावलेल्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्यासाठी प्रार्थना करतो."
Saddened by the tragic crash of Air India flight near Ahmedabad today.
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) June 12, 2025
We extend our condolences to the families of the victims grieving this immense loss.
Our thoughts and prayers are with all those affected by this heartbreaking tragedy.
मृतांमध्ये महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश
या अपघातात महाराष्ट्रातील 10 नागरिकांचे दुःखद निधन झाले आहे. त्यामध्ये क्रू मेंबर्स आणि प्रवासी दोघांचाही समावेश आहे.
क्रू मेंबर्स -
सुमीत सभरवाल (मुख्य वैमानिक) - मुंबई, पवई
दीपक पाठक - बदलापूर
मैथिली पाटील - न्हावा गाव, पनवेल
रोशनी सोनघरे - डोंबिवली
अपर्णा महाडिक - गोरेगाव, मुंबई
साईनीता चक्रवर्ती - जुहू, मुंबई
प्रवासी -
महादेव पवार आणि आशा पवार (पंढरपूरचे रहिवासी)
मयूर पाटील - ठिकाण अद्याप अस्पष्ट
यशा कामदार - नागपूर
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह ओळखण्यासाठी डीएनए चाचण्यांची प्रक्रिया सुरू आहे. क्रू मेंबर्सच्या आणि प्रवाशांच्या कुटुंबियांना कंपनीकडून आणि प्रशासनाकडून आवश्यक ती मदत दिली जात आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीही अपघातात मृत्युमुखी
या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले आहे, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. त्यांच्या मृत्यूने राज्यातील राजकीय वर्तुळातही शोककळा पसरली आहे.
दुर्घटनेमागचं कारण अजूनही तपासाधीन
या अपघातामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टीगेशन ब्युरो (AAIB) आणि DGCA या प्रकरणाची चौकशी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, उड्डाणानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदांतच विमानात मोठा तांत्रिक बिघाड झाला आणि ते नियंत्रणाबाहेर गेलं.
राष्ट्रीय शोक आणि मदतीची घोषणा अपेक्षित
घटनेचं गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारकडून राष्ट्रीय शोकदिन जाहीर केला जाऊ शकतो. याशिवाय पीडितांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीबाबत लवकरच पंतप्रधान कार्यालयाकडून घोषणा अपेक्षित आहे.












Click it and Unblock the Notifications