पराभवानंतर अधीर रंजन चौधरी काँग्रेसवर भडकले
Mumbai: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मावळत्या सभागृहातील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला आहे. तृणमूल काँग्रेसशी समझोता आत्महत्येसारखाच आहे, असे त्यांनी नमूद केलंय. निवडणुकीत पराभूत होताच अधीर रंजन चौधरी यांनी आपली खदखद बाहेर काढलीय.
काँग्रेसचे बडे नेते माझ्या प्रचारासाठी का आले नाहीत मला माहिती नाही. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नजीकच्या मालदा मतदारसंघात प्रचार केला. पण ते माझ्या प्रचाराला आले नाहीत. ते का आले नाहीत याची मला माहिती नाही. काँग्रेसचे हे धोरण वापरा आणि फेकून द्या असे आहे, असा आरोप त्यांनी पुढे केला आहे.

मी गरीब आहे. खासदारकी जाताच आता मला दिल्लीतील घर रिकामी करावे लागणार आहे. माझी मुलगी त्या घराचा वापर शिक्षणासाठी करते. आता मला दिल्लीत नवे घर शोधावे लागणार आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ममता बॅनर्जी यांच्या सरकारशी लढण्यासाठी मी प्रचंड खर्च केला.
पदरमोड केली. राजकारण सोडून माझ्याकडे कोणतेही कौशल्य नाही. मी दुसरे काही करू शकत नाही. माझ्या पराभवानंतर मला साधा फोनसुद्धा कुणी केला नाही, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. माझ्यासमोरील आव्हानांचा सामना मी कसा करणार आहे, याची मला काहीही माहिती नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी केलेला समझोता काँग्रेससाठी आत्महत्या ठरेल, असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे.
कोण आहेत अधीर रंजन चौधरी ?
अधीर रंजन चौधरी यांनी मागच्या लोकसभेत काँग्रेसचा किल्ला लढवला होता. त्याच वेळी पश्चिम बंगालमध्ये त्यांचा ममता बॅनर्जी यांच्याशीही संघर्ष सुरु होता. ममता बॅनर्जी यांच्याशी तसेच तृणमूल काँग्रेसशी त्यांचे खटके उडत होते. मात्र त्यांनी संघर्षाची भूमिका सोडली नाही.
पश्चिम बंगालच्या बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या विरोधात क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली होती. पठाण यांनी अधीर रंजन चौधरी यांचा तब्बल ७० हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
पश्चिम बंगालच्या राजकारणातील ही एक हाय व्होल्टेज लढत मानली गेली. तृणमूल काँग्रेसने हे लढत खूपच प्रतिष्ठेची करून संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पराभव झाल्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. काँग्रेसने मात्र या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया अद्याप व्यक्त केलेली नाही.












Click it and Unblock the Notifications