नजर हटी, दुर्घटना घटी! भीषण अपघाताने देश हादरला; 150 फूट खोल दरीत जीप कोसळली अन् मृत्यूचा तांडव!
Accident News in Marathi : मंगळवारी (दि.15 जुलै) सायंकाळी उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. एक मॅक्स जीप अनियंत्रित होऊन 150 मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका शाळकरी मुलीसह 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 4 महिलांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, 5 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
अपघाताची माहिती आणि बचावकार्य
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोनी पुलाजवळ घडला. जीप मुवानीहून बक्ता येथे जात होती आणि त्यात एकूण १३ प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच तातडीने प्रशासनाचे पथक, एसडीआरएफ, पोलीस आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी अथक प्रयत्न करून जखमींना नदीतून बाहेर काढले आणि तातडीने मुवानी पीएचसी (प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे उपचारांसाठी दाखल केले. सर्व मृत बोकाटा परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले धक्कादायक वास्तव
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जीप दुपारी 4 वाजता प्रवाशांना घेऊन मुवानीहून बक्ताकडे निघाली होती. बक्तापासून थोड्याच अंतरावर असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप थेट दरीत उलटली.
अपघाताची भीषणता इतकी होती की, वाहनाचे अक्षरशः तुकडे झाले. नदीच्या पात्रात जखमी आणि मृतांचा ढीग झाल्याचे हृदयद्रावक दृश्य प्रत्यक्षदर्शींनी पाहिले.
अपघातानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस रुग्णवाहिका आणि बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले. आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि जखमींशी बोलून अपघाताची अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मृतांसोबत सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटवली जात आहे.
प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल
कुमाऊंचे आयुक्त दीपक रावत यांनी घटनेची पुष्टी करत माध्यमांशी बोलताना सांगितले की, दुपारी 4 ते साडे चार वाजेच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाली. एसडीआरएफ आणि एनडीआरएफला तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले असून, ते मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
याशिवाय, एआरटीओ आणि जिल्हा प्रशासनाची टीम देखील घटनास्थळी उपस्थित आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तीन जणांची प्रकृती गंभीर!
पिथोरागडच्या एसएसपी रेखा यादव यांनीही सांगितले की, गाडी मुवानीहून बोक्ताकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती नदीत कोसळली. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, ३ जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications