तुमच्या शरीरात हे लक्षणे दिसत असतील वेळीच सावध व्हा, अन्यथा तुम्हालाही होऊ शकतो ब्रेन स्ट्रोक?
brain stroke symptoms Details in Marathi : कधी तुम्हाला असे वाटते का की, तुम्हाला अचानक बोलण्यात अडथळा येतोय, चक्कर येतेय किंवा शरीराच्या एका बाजूला सुन्नता जाणवणे. मग हा केवळ थकवा नाही, तर एखाद्या गंभीर आजाराची पूर्वसूचना देखील असू शकते?, अशा वेळी तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे.
वरील काही लक्षणे तुम्हाला जाणवतं असतील तर ही ब्रेन स्ट्रोकची स्थिती आहे, जी काही क्षणांत तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. मात्र, यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे, ब्रेन स्ट्रोक येण्यापूर्वी आपले शरीर वेळीच काही संकेत देऊ लागते. त्यामुळे गरज आहे की, त्या लक्षणांना वेळीच ओळखण्याची आणि योग्य वेळी पाऊल उचलण्याची.
आपण अनेकदा आरोग्याच्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे परिणाम घातक ठरू शकतात. ब्रेन स्ट्रोक देखील अशाच गंभीर आजारांपैकी एक आहे, ज्याला वेळेत ओळखल्यास जीव वाचवता येतो. कारण, यामध्ये वेळेला तितकेच महत्त्व असते.

ब्रेन स्ट्रोकची प्रमुख लक्षणे:
१. चेहऱ्याचा एक भाग वाकडा होतो
जर अचानक एखाद्याचा चेहरा एका बाजूला वाकलेला दिसू लागला, किंवा हसताना एका बाजूचा चेहरा हलत नसेल, तर हे ब्रेन स्ट्रोकचे प्राथमिक लक्षण असू शकते. चेहऱ्याच्या स्नायूंवरचा ताबा सुटल्याचे हे संकेत असतात.
2. हात किंवा पायामध्ये अचानक कमजोरी किंवा सुन्नपणा
स्ट्रोक येण्यापूर्वी अनेकदा शरीराच्या एका बाजूला - विशेषतः हात किंवा पायामध्ये - कमजोरी जाणवते, सुन्नपणा वाटतो किंवा चालताना तोल जातो. ही लक्षणे अचानक दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
3. बोलण्यात किंवा समजण्यात अडचण होणे
बोलताना शब्द स्पष्ट न उच्चारता येणे, समोरच्याचे बोलणे नीट न समजणे किंवा आपली विचार मांडता न येणे, हे देखील ब्रेन स्ट्रोकचे महत्त्वाचे लक्षण असू शकते. यामागे मेंदूमधील रक्तप्रवाहात अडथळा येणे हे कारण असते.
४. अचानक तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येणे
जर कोणतीही स्पष्ट कारण नसताना तीव्र डोकेदुखी होऊ लागली, चक्कर यायला लागल्या किंवा बेशुद्ध वाटू लागले, तर हे देखील स्ट्रोकचे गंभीर संकेत असू शकतात, विशेषतः इतर लक्षणांसोबत दिसल्यास.
५. अचानक धूसर दिसणे किंवा एका डोळ्याने दिसेनासे होणे
स्ट्रोकचा परिणाम डोळ्यांवर देखील होतो. अचानक एका किंवा दोन्ही डोळ्यांनी धूसर दिसणे, डबल व्हिजन येणे किंवा अंधार पसरल्यासारखे वाटणे, हे लक्षणेही धोकादायक ठरू शकतात.
ब्रेन स्ट्रोकमध्ये वेळ ही सर्वात मौल्यवान बाब!
वरील लक्षणांपैकी कुठलेही लक्षण आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा रुग्णाला जवळच्या रुग्णालयात दाखल करा. स्ट्रोकनंतरची पहिली 3 ते 4.5 तासांची वेळ ही 'गोल्डन पीरियड' मानली जाते. यामध्ये वेळेवर उपचार झाल्यास रुग्णाचा जीव वाचवता येतो.
आपले शरीर आपल्याशी संवाद साधत असते - गरज आहे त्या इशाऱ्यांना ऐकण्याची. ब्रेन स्ट्रोक येण्याआधी शरीर काही स्पष्ट संकेत देतं, त्यांना वेळेत ओळखणं आणि योग्य कृती करणं हेच जीव आणि मृत्यू यामधील फरक ठरू शकतं.












Click it and Unblock the Notifications