झिका व्हायरसने वाढवली डोकेदुखी; पुण्यात आढळले दोन रुग्ण
पुणे: राज्यातील झिका व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी ठरत आहे. पुण्यात आता झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. या दोघांचाही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी यामुळे महाराष्ट्रात रुग्णांची चिंता वाढला आहे.

रुग्णांमध्ये दिसली ही लक्षणे
रुग्णांना अंगावर पुरळ उठले होते, आणि ताप आला होता. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाने त्यांच्या रक्ताचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीत तपासणीसाठी पाठवले असता त्यातून त्यांच्या अहवालामध्ये डॉक्टरांना झिका व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
डॉक्टरांना संसर्ग झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील अन्य पाच सदस्यांचे रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले. दरम्यान सबंधित डॉक्टरच्या 15 वर्षांच्या मुलीला संसर्ग झाल्याचे समोर आले. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. महानगरपालिका या प्रकरणी युद्ध पातळीवर उपाययोजना राबविण्याची तयारी करत आहे.
राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट
राज्याच्या आरोग्य विभागाने डासांचे नमुने गोळा केले आहेत. परिसरातील सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, परिसरातील गर्भवती महिलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
झिका व्हायरसमुळे कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नाही. परंतु, एखाद्या गर्भवती महिलेला संसर्ग झाला असेल तर तिच्या गर्भामधील बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
अशी होते लागण
झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना झिका विषाणूची लागण होते. हेच डास अन्य व्यक्तींना चावल्यास त्यांना झिकाची लागण होते. पावसाळ्यामध्ये साचलेले पाणी यामुळे डास वाढतात. हे डास चावल्याने डेंग्यू, हिवताप, चिकनगुन्या सारखे आजार होतात. मात्र, झिकाचा रुग्ण सापडल्याने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
झिकाबद्दल थोडक्यात
झिका विषाणू संक्रमित एडिस डास चावल्यामुळे पसरतो असे डॉक्टर सांगतात. डेंग्यू आणि चिकुनगुनिया या सारख्या संसर्ग पसरवण्यासाठी देखील डासांसारखीच ही प्रजाती जबाबदार मानली जाते. 1947 मध्ये युगांडामध्ये हा विषाणू पहिल्यांदा सापडला होता.
आता पुणे शहरात ही दोन प्रकरणे समोर आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखरेख सुरू केली आहे. परिसरात इतर कोणतेही संशयित रुग्ण नसले तरी अधिकाऱ्यांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.












Click it and Unblock the Notifications