sanjay raut health update : संजय राऊत यांना नेमकं झालयं तरी काय? कशी आहे त्यांची प्रकृती, जाणून घ्या
Sanjay raut health update : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी (५ नोव्हेंबर २०२५) रोजी मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती, मात्र अचानक प्रकृतीत बिघाड झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर सध्या डॉक्टरांचे एक विशेष पथक देखरेख ठेवून आहे.

आजाराबद्दल अद्याप अस्पष्टता
संजय राऊत यांना नेमका कोणता आजार झाला आहे, याबद्दल त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर किंवा कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या अचानक कमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. यापूर्वी, नोव्हेंबर २०१९ मध्ये याच रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती, त्यामुळे सध्याही त्यांना हृदयाशी संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
प्रकृती स्थिर, पाच दिवस रुग्णालयात मुक्काम
राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. पुढील पाच दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना रुग्णालयात ठेवले जाईल. प्रकृती गंभीर असल्यामुळेच त्यांनी काही दिवसांपूर्वी दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला होता.
आजारपणातही लेखणीशी नाळ
रुग्णालयात उपचार घेत असतानाही राऊत यांनी आपले काम थांबवलेले नाही. गुरुवारी ६ नोव्हेंबरला त्यांनी 'एक्स'वरून एक भावनिक फोटो पोस्ट करत आपला निर्धार व्यक्त केला. या फोटोत त्यांच्या एका हाताला सलाईन लागलेली दिसत असून, त्याच हातात त्यांनी लेखणी आणि पेपर धरलेला आहे. "हात लिहिता राहिला पाहिजे..." असा संदेश देत, आजारपणातही ते सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.
पंतप्रधान मोदींकडून शीघ्र बरे होण्याची प्रार्थना
राऊत यांच्या तब्येतीच्या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी एक्सवर पोस्ट करून शीघ्र बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. याशिवाय, शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांसह, महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी राऊत लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications