नवरात्रीत मासिक पाळी लांबवण्यासाठी गोळ्या घेताय? हे दुष्परिणाम वाचा, आरोग्याला किती घातक जाणून घ्या
Navrtri Menstrual Period Delaying Pills : तुम्हाला काही दिवसांतच प्रवासाला जायचं आहे किंवा एखादं महत्त्वाचं कार्य आहे, पण त्याच वेळेस तुमची मासिक पाळी सुरू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या तुमच्यासाठी एक सोपा पर्याय ठरतात. पण या गोळ्या कशा काम करतात? त्यांचे फायदे आणि दुष्परिणाम काय आहेत? या गोळ्या गर्भनिरोधक गोळ्यांपेक्षा वेगळ्या कशा आहेत? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या म्हणजे काय, त्या कशा काम करतात?
या गोळ्यांचे मुख्य काम मासिक पाळीला काही दिवसांसाठी पुढे ढकलणे आहे. सामान्यतः, या गोळ्या १७ दिवसांपर्यंत मासिक पाळी पुढे ढकलू शकतात. या गोळ्यांमध्ये Norethisterone नावाचे कृत्रिम रसायन असते, जे नैसर्गिक प्रोजेस्टेरॉन हार्मोनसारखे काम करते.
प्रत्येक महिन्याला, जर अंड्याचे फलन झाले नाही तर शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते. यामुळे गर्भाशयाच्या आतील अस्तर तुटते आणि मासिक पाळी सुरू होते. जर तुम्ही मासिक पाळी सुरू होण्याआधी Norethisterone गोळी घेतली, तर शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी कृत्रिमरित्या वाढते, ज्यामुळे मासिक पाळी तात्काळ सुरू होत नाही आणि ती पुढे ढकलली जाते.
मासिक पाळीच्या गोळ्या आणि गर्भनिरोधक गोळ्यांमधील फरक काय?
मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या फक्त पाळी पुढे ढकलतात, त्या गर्भधारणा थांबवत नाहीत. या गोळ्या फक्त प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढवून मासिक पाळीला थांबवतात, पण अंड्याचे फलित होणे थांबवत नाहीत. त्यामुळे, या गोळ्या घेत असतानाही गर्भधारणेची शक्यता असते.
याउलट, गर्भनिरोधक गोळ्या शरीरात इतर हार्मोन्स सोडून अंड्याचे फलन होण्यापासून थांबवतात. त्यामुळे या गोळ्या घेतल्याने गर्भधारणा होत नाही. या गोळ्या मासिक पाळीला पुढे ढकलत नाहीत, ती ठरलेल्या वेळेतच येते.
या गोळ्यांचे दुष्परिणाम काय आहेत?
कमी दिवसांसाठी या गोळ्या घेतल्यास त्याचे मोठे दुष्परिणाम होत नाहीत. पण, काही महिलांमध्ये त्वचेवर लालसरपणा येणे, चक्कर येणे, डोकेदुखी किंवा शरीरात पाणी साठणे असे दुष्परिणाम दिसू शकतात.
लांब काळ वापर धोकादायक!
शक्यतो, या गोळ्या घेऊच नये, असे तज्ज्ञ डाॅक्टर सल्ला देतात. जर तुम्ही दर महिन्याला याचा वापर केला, तर शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. एखादे उदाहरण द्यायचे झाल्यास कावीळ सांगता येईल.
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
आणीबाणीच्या स्थितीत तु्म्हाला जर मासिक पाळी लांबवण्याच्या गोळ्या घ्यायच्याच झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या कधीही घेऊ नका. डॉक्टर तुमच्या आरोग्याची तपासणी करून योग्य डोस आणि कालावधी ठरवतील. म्हणजेच स्वःत डाॅक्टर होण्याचा प्रयत्न करायला नको.
गोळ्या थांबवल्यानंतर मासिक पाळी लगेच येते का?
होय, साधारणपणे गोळी घेणे थांबवल्यानंतर तीन ते चार दिवसांनी मासिक पाळी सुरू होते. पण, प्रत्येक व्यक्तीनुसार यामध्ये फरक असू शकतो. जर गोळी थांबवल्यानंतर एक आठवड्यात पाळी आली नाही, तर तुम्ही गर्भवती आहात का, याची तपासणी करायला हवी.












Click it and Unblock the Notifications