कोरोनाची लाट येऊ शकते..? कोविड-19 संदर्भात काय करायचे काय नको? समजून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर
Maharashtra Government Corona Guidelines : देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असून केरळनंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक संसर्ग होत असलेले दुसरे राज्य आहे. कोविड -19 मुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाणही महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्रात प्रकोप वाढू शकतो. लोक आजही कोरोना संसर्गाचा तो घातक काळ विसरलेले नाहीत. कोरोना जीवघेणा किती आहे हे पुन्हा सांगायची गरज नाही, यामुळे येणाऱ्या अडचणींमुळे किती काळ परिणाम भोगावे लागतात याचे प्रत्येकाला कटू अनुभव आहेत, या सर्व पार्श्वभुमीवर आता कोरोनाविरुद्ध पुन्हा लढण्याची वेळ आली आहे.
याच धर्तीवर आरोग्य प्रशासन गंभीर आहे, राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

कुणाची कोविड-19 चाचणी करण्याची गरज?
कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी राज्यात आयएलआय (इन्फ्लूएंझा सारखा आजार) आणि एसएआरआय (गंभीर तीव्र श्वसन संसर्ग) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. रुग्ण कोविड पॉझीटीव आढळल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत.
राज्य शासनाची आकडेवारी काय सांगते..
जानेवारी 2025 पासून 12 हजार 11 रुग्णांची कोविड चाचणी केली असून त्यापैकी 873 पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून आतापर्यंत 369 रुग्ण बरे झाले आहेत. याबाबत आरोग्य आरोग्य विभागाने माहिती जाहीर केली आहे.
कोविड रुग्णांची तुरळक वाढ फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर इतर राज्यात तसेच काही इतर देशात देखील दिसून येत आहे. फ्लूसदृश्य आजार व एसएआरआय (तीव्र श्वसन दाह असलेले रुग्ण) यांचे आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण सुरू आहे. तसेच तीव्र श्वसनदाह असलेल्या सर्व रुग्णांचे कोविड-19 या आजारासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. तसेच फ्लू-सदृश आजार असलेल्या रुग्णांपैकी 5 % रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. सर्व आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेले नमुने संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एन आय व्ही, पुणे व बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे व राज्यातील इतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात.
ऑक्सिजन, आयसीयू बेड सज्ज
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांचे स्तरावर कोविड 19 साथरोग संदर्भात पूर्वतयारीचा आढावा विभागीय स्तरावर घेण्यात येत असून त्यामध्ये सर्व यंत्रणेला रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, आरटीपीसीआर चाचणी, ऑक्सीजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन उपलब्धतेबाबत सर्व तयारी ठेवण्यासंदर्भात जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तथापि काळजी घ्यावी.
कोरोना संसर्ग - काय करावे काय नको?
- खोकताना व शिंकताना रूमालाचा वापर करावा.
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
- सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, धाप लागणे इत्यादी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयास संपर्क साधून उपचार व आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.
- अशा प्रकारची लक्षणे, इतर आजाराने व्याधीग्रस्त लोकांमध्ये आढळून आल्यास विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
काय आहेत कोरोनाची लक्षणे
- घसा खवखवणे
- थकवा
- सौम्य खोकला
- ताप
- नाक बंद होणे
- डोकेदुखी
- मळमळ
- भूक न लागणे
- गॅस्ट्रोइंटेस्टाइनल बिघाड
- विशेषतः चव किंवा वास कमी होणे
- हा व्हेरीयंट किती आहे संसर्गजन्य?
- चीनमधील आकडेवारीनुसार, NB.1.8.1 प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता इतर ओमिक्रॉन उप-प्रकारांपेक्षा जास्त आढळून आलेली नाही.
कोरोनापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?
1. स्वच्छता - साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा (किमान 20 सेकंद)
साठ टक्के अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर वापरा.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.
2. मास्क - सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी नेहमी मास्क घाला.
सर्जिकल मास्क किंवा N95 मास्क चांगले संरक्षण प्रदान करतात.
3. सामाजिक अंतर राखा - इतरांपासून कमीत कमी 6 फूट अंतर ठेवा.
विशेषतः खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या लोकांपासून थोडे लांबच राहीलेले बरे. आजारी वाटत असल्यास घरीच रहा.
4. डाॅक्टरांचा सल्ला - जर तुम्हाला सौम्य लक्षणे (उदा. ताप, खोकला, थकवा) जाणवत असतील तर स्वतःला घरी वेगळे करा. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
5. लसीकरण - कोविड-19 चे सर्व डोस (बूस्टरसह) वेळेवर घ्या. ही लस संसर्गाची तीव्रता कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
6. खोकला आणि शिंकताना सावधगिरी - खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा कोपर वापरा. वापरलेले टिशू ताबडतोब कचऱ्याच्या डब्यात टाका.
7. आरोग्य विभागाच्या सूचना - सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा आरोग्य मंत्रालय किंवा WHO ने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा.












Click it and Unblock the Notifications