पोटदुखी अन् थकव्यासारख्या 'या' 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा या कॅन्सरचा होईल धोका!
Colon Cancer Symptoms : बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आजकाल गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः कोलन कर्करोग, जो पूर्वी ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळायचा, तो आता तरुणांना वेगाने आपल्या जाळ्यात ओढत आहे.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या २०२६ च्या ताज्या अहवालानुसार, ५० वर्षांखालील पुरुषांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे हे प्रमुख कारण बनले आहे, तर महिलांमध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख कारण ठरले आहे.

तरुणांमध्ये वाढते प्रमाण: एक धोक्याची घंटा
गेल्या काही दशकांत वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे फुफ्फुस आणि स्तनांच्या कर्करोगाच्या मृत्यूदरात घट झाली असली, तरी कोलन कॅन्सरच्या बाबतीत चित्र उलट आहे.
1990 पासून 50 वर्षांखालील लोकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढणे चिंताजनक आहे. तज्ज्ञांच्या मते, हा आजार 'सायलेंट किलर'सारखा काम करतो, ज्याची सुरुवातीची लक्षणे सामान्य वाटू शकतात.
दुर्लक्षित करू नका 'ही' महत्त्वाची लक्षणे
कोलन कॅन्सरची लक्षणे ओळखून वेळेवर उपचार करणे हाच जीव वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. खालील लक्षणांकडे बारकाईने लक्ष द्या:
१. सतत होणारी पोटदुखी
अधूनमधून पोट दुखणे ही सामान्य गोष्ट असली, तरी पोटात सतत मुरडा येणे किंवा पोटाच्या विशिष्ट भागात दीर्घकाळ वेदना होणे हे कोलन कॅन्सरचे संकेत असू शकतात. जर वेदना थांबत नसतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.
२. स्पष्ट कारणाशिवाय वजन कमी होणे
तुम्ही कोणताही व्यायाम किंवा डाएट करत नसतानाही अचानक वजन कमी होत असेल, तर ही धोक्याची सूचना आहे. कर्करोगाच्या पेशी शरीरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणात वापरतात, ज्यामुळे अचानक वजन कमी होऊ लागते.
३. विश्रांतीनंतरही जाणवणारा थकवा
कामाच्या व्यापाने थकवा येणे स्वाभाविक आहे. मात्र, भरपूर विश्रांती घेऊनही जर तुम्हाला सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल, तर ते कोलनमधील अंतर्गत रक्तस्त्रावाचे लक्षण असू शकते. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते आणि व्यक्तीला सतत गळून गेल्यासारखे वाटते.
४. शौचाच्या सवयींमध्ये बदल
बद्धकोष्ठता (Constipation) किंवा वारंवार होणारा जुलाब (Diarrhea) जर काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. आतड्यांमध्ये ट्यूमर वाढल्यामुळे पचन प्रक्रियेत अडथळे येतात, ज्यामुळे या समस्या उद्भवतात.
५. मलवाटे रक्त येणे
मलमध्ये रक्त दिसणे हे सर्वात गंभीर लक्षण मानले जाते. अनेक तरुण याला 'मूळव्याध' समजून घरगुती उपचार करतात, ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. रक्ताचा रंग चमकदार लाल असो वा गडद, तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे.
डॉक्टरांना कधी भेटावे?
मेयो क्लिनिकच्या मते, जर वरीलपैकी कोणतीही लक्षणे २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असतील, तर तातडीने तज्ज्ञांची भेट घ्यावी. वेळेवर केलेली 'कोलोनोस्कोपी' किंवा इतर चाचण्यांमुळे कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात होऊ शकते, ज्यामुळे यशस्वी उपचारांची शक्यता वाढते.












Click it and Unblock the Notifications